Rohit Sharma Press Conference, Ishan Kishan IND vs WI: रोहित शर्माने आज वन डे संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून प्रथमच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने काही महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार फलंदाज इशान किशन हा वेस्ट इंडिजविरूद्ध पहिल्या वन डे सामन्यात भारतासाठी डावाची सुरुवात करेल असं रोहित शर्माने स्पष्टपणे सांगितलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणून संघात परतला. पण मालिकेच्या काही दिवस आधी भारतीय संघाला कोविडचा फटका बसला. ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि नेट बॉलर नवदीप सैनी यांना वन डे मालिकेला मुकावे लागणार आहे. तसेच, बहिणीच्या लग्नामुळे केएल राहुलही पहिल्या वन डे साठी उपलब्ध नाही. त्यामुळे भारतीय संघात इशान किशनला दाखल करून घेण्यात आले असून तोच उद्याच्या सामन्यात ओपनिंग करणार आहे, असं रोहितने स्पष्ट केलं.
डावखुऱ्या इशान किशनला वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी२० मालिकेत संघात घेण्यात आले होते. पण वन डे मध्ये सलामीवीर म्हणून पहिल्या पसंतीचे अनेक खेळाडू अनुपलब्ध झाल्याने किशनला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. इशान किशनने गेल्या वर्षी वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्यावहिल्या चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकून त्याने साऱ्यांनाच थक्क केलं होतं. त्याच सामन्यात त्याने वन डे पदार्पणात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही नोंदवला होता. आता वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेत तो काय कमाल करतो याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.
दरम्यान, इशाननेच रोहितसोबत ओपनिंग करावी असं माजी क्रिकेटर सबा करीम म्हणाले होते. "तुमच्याकडे पर्याय उरलेले नाहीत. काही खेळाडूंना कोरोना झालाय त्यामुळे तुमचा संघ थोडासा खचू शकतो. त्यामुळे मला वाटतं की या साऱ्या घडामोडींकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघा. जर इशान किशनने रोहित शर्मासोबत सलामी दिली, तर ते नक्कीच फायद्याचं होईल. इशान किशन हा स्ट्राइक रेटच्या बाबतीत नेहमीच पुढे असतो. अशा वेळी रोहित सेट व्हायला वेळ घेत असताना इशान पॉवर-प्लेचा योग्य फायदा संघाला मिळवून देऊ शकतो", असं रोखठोक मत करीम यांनी व्यक्त केलं होतं.
Web Title: Rohit Sharma confirms in Press Conference that Mumbai Indians Star Batter Ishan Kishan will open the innings with him in IND vs WI 1st ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.