Join us  

IND vs WI : अजिंक्य रहाणे पुन्हा कसोटी कर्णधार बनणार? BCCI रोहितशी बोलून निर्णय घेणार

India Tour of West Indies : जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलच्या पराभवानंतर रोहित शर्माच्या ( Rohit sharma) नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 11:24 AM

Open in App

India Tour of West Indies : जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलच्या पराभवानंतर रोहित शर्माच्या ( Rohit sharma) नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. विराट कोहलीने तडकाफडकी कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी रोहितच्या खांद्यावर आली. त्यानंतरही रोहित बराच काळ दुखापतीमुळे काही कसोटी मालिकेला मुकला. आता वेस्ट इंडिज दौऱ्यावरही रोहित शर्मा काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. १२ जुलैपासून भारत - वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होत आहे आणि त्यात दोन कसोटी, तीन वडे आणि पाच ट्वेंटी-२० सामने खेळले जाणार आहेत. WTC 2023-25 च्या हंगामाची या दौऱ्यातून सुरूवात होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये भारताला २०९ धावांनी पराभूत केले. त्यानंतर रोहित व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर टीका होऊ लागली. त्यात त्यांनी कसोटी नंबर वन गोलंदाज आर अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा न दिल्याने चाहत्यांना राग अनावर झाला. नेतृत्वच नव्हे, तर रोहितने फलंदाजीतही निराशा केली. दोन डावांत त्याने १५ व ४३ धावा केल्या. आयपीएलमध्येही त्याने १६ सामन्यांत २०.७५च्या सरासरीने ३३२ धावा केल्या. गुजरात टायटन्सच्या मेहरबानीमुळे मुंबई इंडियन्स क्वालिफायर २ मध्ये खेळला.

''निवड समिती वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहितला काही सामने विश्रांती देऊ शकतात. आयपीएल आणि WTC Final मध्ये रोहितची कामगिरी चांगली झालेली नाही. तो कदाचित कसोटी मालिकेला किंवा ८ सामन्यांच्या मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकू शकतो. याबाबत निवड समिती याबाबत रोहितशी चर्चा करतील आणि निर्णय सांगतील,''असे TOI ने दिलेल्या वृत्तात सूत्रांनी सांगितले.  

WTC चे नवीन पर्व सुरू होतेय आणि कसोटी संघात नेतृत्वासोबतच अनेक सीनियर खेळाडूंना बदलण्याची मागणी होतेय. विराट कोहली चांगल्या फॉर्मात नाही आणि त्यालाही या दौऱ्यावर विश्रांती दिली जाऊ शकते. चेतेश्वर पुजाराला डच्चू दिला जाऊ शकतो. रोहित शर्मा दोन कसोटी सामन्यांची मालिका न खेळल्यास, अजिंक्य रहाणेकडे जबाबदारी सोपवली जाऊ शकते. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने २०२१-२२ मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती. रहाणेने आयपीएल २०२३ मध्ये दमदार कामगिरी करून कसोटी संघात पुनरागमन केले आणि ८६ व ४६ धावा केल्या. विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजअजिंक्य रहाणेरोहित शर्मा
Open in App