Rohit Sharma Captaincy: आताच्या घडीला टीम इंडिया चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. विराट कोहलीने टीम इंडियाचे कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाची कमान आता रोहित शर्माच्या खांद्यावर आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचे प्रदर्शन प्रभावी झाले नाही, असे सांगितले जात आहे. यातच आता रोहित शर्मा कर्णधारपद सोडू शकेल, असा कयास बांधला जात आहे. रोहित शर्माने अचानकपणे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला तर नवा कर्णधार कोण असू शकेल, याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तयारीला सुरुवात केली आहे.
रोहितकडे द्विपक्षीय मालिकेव्यतिरिक्त टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धा खेळली गेली आणि आता एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा खेळली जाईल. मात्र, रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत फारशी चांगली झालेली नाही. विशेषत: ICC ने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये गेल्या काही वर्षात भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. आशिया चषकात ते अंतिम फेरीतही पोहोचू शकला नाही.
रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार?
भारतीय संघ यंदा मायदेशात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. त्यावेळी रोहित शर्माचे वय ३६ असेल. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित शर्मा कर्णधारपद सोडू शकतो, असा कयास बांधला जात आहे. त्यामुळी BCCIला लगेचच दुसऱ्या कर्णधाराची निवड करावी लागणार आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात BCCI च्या एका अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे.
BCCIचा काय आहे प्लान?
BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच करणार असल्याचे स्पष्ट आहे. पण भविष्यातील घडामोडींसाठी आपल्याकडे योजना असायला हवी. एखादी गोष्ट अचानक घडली, तर त्यासाठी आपण तयार असायला हवे. जर रोहितने अचानक विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय प्रकारातून निवृत्ती किंवा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, तर आपल्याकडे प्लान तयार असणे आवश्यक आहे, असे सांगताना हार्दिक पंड्या कर्णधार असताना चांगले प्रदर्शन केले आहे. हार्दिक युवा खेळाडू आणि उत्तरोत्तर चांगली कामगिरी करू शकेल. एकूण परिस्थितीनुसार रोहित शर्माला पर्याय म्हणून त्याच्यासारखा दुसरा चांगला ऑप्शन नाही. मात्र, त्याला दीर्घकाळ पाठिंबा देण्याची गरज आहे, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दरम्यान, भारतीय संघाचा पुढचा कर्णधार म्हणून स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्याचे नाव आघाडीवर आहे. भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपदही हार्दिक पंड्या सांभाळत आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडे एकदिवसीय संघाची कमानही सोपवली गेल्यास आश्चर्य वाटू नये, असे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"