Rohit Sharma Toss Controversy, IND vs AUS Gabba Test : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्यातील पहिली कसोटी भारताने तर दुसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकल्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी आजपासून सुरु झाली. ब्रिसबेन गाबाच्या मैदानावर ही कसोटी खेळवण्यात येत आहे. सामन्यात पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ १३.२ षटकांचा खेळ होऊ शकला. त्या वेळेत ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर नॅथन मॅकस्वीनी आणि उस्मान ख्वाजा यांनी संयमी खेळ केला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतल्याच्या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटले. पण ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राला मात्र याचे नवल वाटले नाही. उलट तो जे बोलला त्यातून भारतीय चाहते चांगलेच खवळतील.
मॅकग्राने रोहितला डिवचले...
"रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी न घेता गोलंदाजी घेतली याचे मला अजिबात नवल वाटले नाही. कारण मला स्पष्टपणे दिसलं की रोहित घाबरला. त्याला त्याच्या संघाला सामन्याच्या सुरुवातीलाच फलंदाजीसाठी उतरवायचं नव्हतं. तो थोडा बचावात्मक खेळ करतोय असं दिसतंय. नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही प्रथम गोलंदाजी घेतली आणि निर्णय फसला तर मिडिया तुमच्यावर थोडीफार टीका करते. पण जर तुम्ही प्रथम फलंदाजी घेतली आणि वाईट कामगिरी केलीत तर मात्र तुमच्या निर्णयावर टोकाची टीका होते," असे ग्लेन मॅकग्रा म्हणाला.
रोहितने चुकीचा पर्याय निवडला- मॅथ्यू हेडन
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन यानेदेखील रोहितच्या निर्णयावर टीका केली. मालिका जिंकण्यासाठी आता ऑस्ट्रेलियाच फेव्हरिट आहे. आजच्या सामन्यानंतर मी दावा करतो की ऑस्ट्रेलिया मालिका जिंकेल. याला सर्वात मोठे कारण म्हणजे टॉसनंतरचा रोहितचा निर्णय. भारतीय कर्णधाराने टॉस जिंकूनदेखील वाईट पर्याय निवडला. गाबाचे मैदान फलंदाजीसाठी खूपच छान आहे. येथे पहिल्या तीन दिवसात फलंदाजांना चांगली मदत मिळते," असे मॅथ्यू हेडन म्हणाला.
गाबाच्या मैदानावर कसा आहे नाणेफेकीचा इतिहास?
ब्रिसबेनच्या गाबा मैदानावर गेल्या २४ कसोटी सामन्यांमध्ये १६ वेळा कर्णधारांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसे असले तरीही २४ पैकी १९ सामन्यांचाच निकाल लागला. त्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ १० वेळा तर गोलंदाजी करणारा संघ ९ वेळा सामना जिंकला. त्यामुळे रोहित शर्माने घेतलेल्या निर्णयाचा फारसा मोठा फरक पडेल असे वाटत नाही.