Rohit Sharma Bowled Out After Hitting Fifty : न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या भारताच्या सलामी जोडीनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. न्यूझीलंच्या संघाने उभारलेली मोठी आघाडी भेदण्यासाठी ही जोडी जमली. पण पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी झाली असताना यशस्वी जैस्वाल एक चुकीचा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. गरज नसताना एजाज पटेलच्या गोलंदाजीवर त्याने पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला अन् विकेट किपर टॉम ब्लंडेल (Tom Blundell) याने कोणतीही चूक न करता त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
रोहित बेसावध राहिला की, तो अनलकी ठरला?
दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा अगदी सेट झाला होता. खणखणीत चौकार मारून त्याने अर्धशतकही पूर्ण केले. यासाठी त्याने ५९ चेंडूंचा सामना केला. पण या सुरेख खेळीनंतर त्याने एजाज पटेलच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली. भारताच्या दुसऱ्या डावातील २२ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो आउट झाला. एजाज पटेल याने टाकलेला चेंडू रोहितनं उत्तमरित्या डिफेन्स केला. हा चेंडू स्टंम्पवर जाईल याची कल्पनाही त्याने केली नव्हती. पण जे घडलं ते रोहितच्या इनिंगला ब्रेक लावणारे होते. त्याची विकेट पाहिल्यानंतर तो बेसावध राहिला की, अनलकी ठरला? असा प्रश्न निर्माण होतो.
मग रोहितवर हताश होऊन तंबूत परण्याची आली वेळ
विकेट पडल्यावर रोहित शर्माच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप काही सांगून जाणारे होते. चेंडू डिफेन्स केल्यावर तो स्टंपच्या दिशेनं जाईल, याची कल्पनाही त्याने केली नव्हती. जे घडलं ते काही क्षणात घडलं. ज्यामुळे रोहितला चेंडू अडवण्याची संधीच मिळाली नाही. मोठी आघाडी भेदण्यासाठी ज्या तोऱ्यात सुरुवात करण्याची गरज होती, ते काम रोहित यशस्वी जोडीनं केले. पण एक मोठी खेळी करण्याची संधी तो हुकला.