BCCI चा अध्यक्ष सौरव गांगुली सध्या चुकीच्या कारणामुळे चर्चेत आहे. विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत केलेल्या फटकेबाजीनंतर गांगुली खोटारडा ठरला होता. ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद न सोडण्याची विनंती विराटला केल्याचा दावा गांगुलीनं केलेला आणि त्यावर विराटनं अशी मला कोणीच विचारणा केली नसल्याचे सांगितले. त्यानंतर Virat Kohli vs Sourav Ganguly असा सामना रंगताना दिसतोय. त्यात गांगुलीनं दिलेल्या मुलाखतीत वन डे कर्णधारपदावरून मोठं विधान केलं आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावर्षी चांगली कामगिरी करेल अशी आशा त्यानं व्यक्त केली.
''कर्णधार म्हणून रोहितनं जे काही यश मिळवलेय, त्यानंतर वन डे संघाचे कर्णधारपदाचा तो खरा हकदार आहे. मुंबई इंडियन्ससाठी पाच, डेक्कन चार्जर्सकडून एक जेतेपद हे यशच सर्व काही सांगून जातं. जेव्हा विराट कोहलीनं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्या पदासाठी रोहितच योग्य उमेदवार होता. न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकून त्यानं सुरुवात दणक्यात केली आहे. त्यामुळे या वर्षी जे वर्ल्ड कप स्पर्धेत घडलं, ते पुढील वर्षा पाहायला मिळणार नाही, अशी अपेक्षा आहे,''असे गांगुली Backstage with Boria या कार्यक्रमात म्हणाला.
''प्रामाणिकपणे सांगायचं तर २०१७ व २०१९च्या आयसीसी स्पर्धेत भारतानं चांगली कामगिरी केली. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आम्हाला अंतिम फेरीत हार मानावी लागली. त्यानंतर २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत संघाची वाटचाल दमदार सुरू होती, परंतु एका वाईट दिवसानं दोन महिन्यांची मेहनत पाण्यात गेली. यावेळच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीवर मी निराश झालो. मागील ४-५ वर्षांतील भारतीय संघाची ही सर्वात खराब कामगिरी होती,''असे मत गांगुलीनं व्यक्त केलं.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय खेळाडू मुक्तपणे खेळले नाही, असे गांगुलीला वाटते. पाकिस्ताननं भारताला १० विकेट्स राखून पराभूत केलं, तर न्यूझीलंडनंही ८ विकेट्सनं विजय मिळवला. या दोन दारूण पराभवानंतर भारतीय संघाला मोठा धक्काच बसला. गांगुली म्हणाला,''मला यामागचं कारण माहित नाही, परंतु भारतीय खेळाडू मुक्तपणे खेळले नाही. मोठ्या स्पर्धेत असं कधीकधी होतं, तुम्ही खूप दडपण घेता. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेचा १५% खेळ केला.''