IPL 2023, MI vs RCB : सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीने मंगळवारी रात्री वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. पण, सूर्याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ८३ धावांच्या खेळीने मुंबईला १६.३ षटकांत विजय मिळवून दिला. या सामन्यात मुंबईच्या विजयापेक्षा DRS निर्णयाचीच चर्चा होत आहे. कर्णधार रोहित शर्माला DRS अंतर्गत LBW आऊट देण्यात आले. यावर मोहम्मद कैफ, युवराज सिंग आणि मुनाफ पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. रोहितलाही त्या विकेटचे आश्चर्य वाटले होते. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतरही तो रिप्ले पाहत होता आणि निर्णयावर विश्वास बसत नव्हता.
रोहितला वानिंदू हसरंगाच्या ५व्या षटकातील शेवटचा चेंडू क्रीजच्या पलीकडे खेळायचा होता. तो पूर्णपणे चुकला. चेंडू पॅडला लागला. यावर आरसीबीने डीआरएस घेतला, त्यानंतर तिसऱ्या पंचाने त्याला आऊट घोषित केले. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. रोहित ३.५ मीटरपेक्षा जास्त अंतराने क्रीजच्या बाहेर होता. अशा परिस्थितीत त्याला बाद करणे समजण्यापलीकडे होते. यावर मुनाफ पटेलने अंतर स्पष्ट केले आणि लिहिले, आता डीआरएससाठीही डीआरएस घ्यावे लागेल. दुर्दैवी रोहित शर्मा. जनता काय म्हणते, बाहेर आहे की नाही?