भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवताना आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठी भरारी घेतली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 असा दबदबा राखला. या मालिकेत प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला आलेल्या रोहित शर्मानं धावांचा पाऊस पाडला. या कामगिरीचा त्याला आयसीसी कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये फायदा झालेला पाहायला मिळाला. त्यानं आयसीसी रँकिंगमध्ये गरुड भरारी घेत एका विक्रमाला गवसणी घातली. त्यानं कर्णधार विराट कोहली आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर यांच्याशी बरोबरी केली.
रोहितनं तीन सामन्यांत 132.25च्या सरासरीनं धावा केल्या. त्यात एका द्विशतकासह तीन शतकांचा समावेश होता. रोहितनं या मालिकेत 4 डावांत 529 धावा कुटून मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला. रोहितनं 12 क्रमांकाची झेप घेत कसोटी फलंदाजांमध्ये दहावे स्थान पटकावले. रोहितनं दहावे स्थान पटकावून एका विक्रमाला गवसणी घातली.
आयसीसीच्या तीनही फॉरमॅटच्या रँकिंगमध्ये रोहितनं अव्वल दहात आपले स्थान पटकावले आहे. अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा रोहित हा तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी कोहली अन् गंभीरनं असा पराक्रम करून दाखवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीपूर्वी रोहित 44 व्या स्थानावर होता. त्यात सुधारणा करताना तो दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रमवारीत रोहित अनुक्रमे दुसऱ्या व सातव्या स्थानावर आहे. कोहली या तीनही फॉरमॅटमध्ये फलंदाजांच्या क्रमावारीत अव्वल स्थानावर होता, तर गंभीर कसोटी व ट्वेंटी-20त अव्वल होता आणि वन डे आठव्या स्थानावर होता.
अजिंक्य रहाणेनेही चार स्थानांच्या सुधारणेसह कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचवा क्रमांक पटकावला आहे. रांची कसोटीत 116 धावांची खेळी केली होती. नोव्हेंबर 2016मध्ये रहाणे पाचव्या स्थानी होता. मयांक अग्रवालने 18वे स्थान पटकावले आहे. गोलंदाजांत मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी अनुक्रमे 14 व 21 वे स्थान पटकावले आहे. शमीच्या खात्यात 751 गुण, तर यादवच्या खात्यात 624 गुण आहेत.