मुंबई इंडियन्सचं आणखी एक आयपीएल पर्व निराशाजनक राहिले.. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळले आणि १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह दहाव्या क्रमांकावर राहिले. काल घरच्या मैदानावर झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात त्यांना लखुौ सुपर जायंट्सकडूनही हार मानावी लागली. २०१९ व २०२० मध्ये सलग दोन पर्व जिंकल्यानंतर पुढील तीन वर्षांत त्यांना फक्त एकदाच प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला आहे. २०२२मध्येही ते गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर होते. हार्दिकच्या नेतृत्वाखाली MI नव्या सुरुवातीसाठी तयार होते, परंतु चाहत्यांचा रोष आणि त्यातून हार्दिकवर झालेल्या टीकेचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला. संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून माजी कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) या खराब कामगिरीची जबाबदारी घेतली आणि आयपीएल २०२४ हे त्यांच्या प्लाननुसार नाही राहिले, हे कबुल केले.
"आमचा हंगाम योजनेनुसार गेला नाही. यासाठी आम्ही स्वतःला दोषी ठरवतो, कारण आम्ही मोसमात खूप चुका केल्या. आम्ही अनेक सामने गमावले जे आम्हाला जिंकायला हवे होते, परंतु हे आयपीएलचे स्वरूप आहे.
तुम्हाला काही संधी मिळतात आणि जेव्हा त्या येतात त्याचं सोनं करायला पाहिजे,” असे रोहितने JioCinema Match Center Live वर सांगितले. "एक फलंदाज म्हणून, मला माहित आहे की मी अपेक्षित कामगिरी करू शकलो नाही. एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर मला हे माहित आहे की जर मी जास्त विचार केला तर त्याचा कामगिरीवर परिणाम होईल. मी फक्त चांगल्या मानसिकतेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. योग्य झोनमध्ये सराव करत राहा आणि खेळातील सर्व त्रुटी सुधारणे, हे माझ्या हातात आहे,” असेही रोहित पुढे म्हणाला.
मिशन वर्ल्ड कप...
रोहित शर्माने आता सर्व लक्ष २ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेकडे वळवले आहे. भारतीय संघ १ जूनला बांगलादेशविरुद्ध एकमेव सराव सामाना खेळेल. भारताला अ गटात अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि आयर्लंडचा सामना करायचा आहे. भारतीय संघ सुरुवातीला आयपीएल लीग स्टेजच्या समाप्तीनंतर लगेचच २१ मे रोजी न्यूयॉर्कला रवाना होणार होता. पण, आता संघ २५ व २६ मे रोजी दोन बॅचमध्ये रवाना होणार आहे. न्यू यॉर्कमध्ये भारताचे लीग सामने ५ जून (वि. आयर्लंड), ९ जून ( वि. पाकिस्तान ) आणि १२ जून ( वि. अमेरिका ) रोजी होणार आहेत. कॅनडाविरुद्धचा अंतिम लीग सामना १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद