Rohit Sharma Fitness Update: रोहित शर्माला दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी वन डे आणि टी२० संघाचे कर्णधार करण्यात आलं. तसंच कसोटी संघाचं उपकर्णधारपदही त्याच्याकडे सोपवण्यात आलं. पण दुखापतीमुळे रोहित शर्माला संपूर्ण आफ्रिका दौऱ्यालाच मुकावं लागलं. स्नायूंच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा आफ्रिका दौरा खेळू शकला नाही. पण त्या दुखापतीतून आता रोहित शर्मा हळूहळू सुधारतो आहे. पुढच्या महिन्यात असलेल्या विंडीजविरूद्धच्या क्रिकेट मालिकेआधी तो पूर्णपणे तंदुरूस्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी सराव सत्रात रोहितच्या स्नाय़ूंच्या दुखापतीने उचल खाल्ली होती. त्यामुळे रोहितला आफ्रिकेतील कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. पाठोपाठ त्याला वन डे मालिकेलाही मुकावे लागले. मात्र बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करतो आहे. तो दुखापतीतून झटपट बरा होत आहे. विंडिज दौऱ्याआधी रोहित पूर्णपणे फिट असेल अशी अपेक्षा आहे. विंडिज दौऱ्याला आता तीन आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. भारत-विंडिज यांच्यात तीन वन डे आणि ती टी२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. वन डे मालिका ६ ते १२ फेब्रुवारी आणि टी२० मालिका १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. सहा फेब्रुवारीला भारत-विंडिज पहिला सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळला जाणार आहे. त्यामुळे तीन आठवड्यांच्या आत रोहित पूर्णपणे तंदुरूस्त होईल अशी माहिती आहे.
रोहित आधीदेखील झाला होता दुखापतग्रस्त
रोहितचा स्नायूंच्या दुखापतीचा त्रास जुना आहे. या दुखापतीच्या कारणास्तव रोहितला २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळण्यात आलेल्या वन डे मालिकेला मुकावे लागले होते. शेवटच्या दोन कसोटी सामन्यात त्याला दुखापतीतून पूर्णपणे फिट झाल्याने पुनरागमन करता आले होते.
बीसीसीआयच्या नव्या नियमावलीनुसार, एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास त्याला दुखापतीतून पूर्ण बरं झाल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून फिटनेसचे सर्टिफिकेट सादर करावं लागतं. त्यानंतर निवड समिती संघ निवडताना त्या खेळाडूचा विचार करते. रोहित सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतच असून तो लवकरच फिट होईल असा विश्वास त्याच्या फॅन्सनादेखील आहे.