Rohit Sharma on Suryakumar Yadav, Maharashtra Vidhan Bhavan Felicitation: भारतीय क्रिकेट संघाने २००७ नंतर तब्बल १७ वर्षांनी टी२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. कॅरेबियन बेटांवर भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. टीम इंडियाने टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवला. भारतीय संघ गुरुवारी भारतात दाखल झाला आणि आज संघातील चार मुंबईकर क्रिकेटपटूंचा सन्मान महाराष्ट्राच्या विधानभवनात करण्यात आला. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी रोहित शर्माने केलेल्या भाषणात एक असे विधान केले की सर्व सभागृहात हशा पिकला.
भारतीय संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफचा सत्कार केला जात रोहित शर्माला आपल्या भावना व्यक्त करण्यास सांगितले. त्याच्याआधी सूर्यकुमार यादव याने आपल्या भावना मांडताना विजयाला कारण ठरलेल्या कॅचबाबत भाष्य केले होते. त्यात सूर्या म्हणाला होता की, तो कॅच माझ्या हातात बसला आणि म्हणून आपण सामना जिंकलो. याबाबत रोहित शर्माने आपल्या भाषणात बोलताना मजेशीर विधान केले. "सूर्या म्हणाला की त्याच्या हातात कॅच बसला. तो कॅच बसला म्हणून बरं झालं, नाही तर पुढे त्याला मी बसवलं असतं" असं विधान रोहितने केलं. त्या विधानानंतर सभागृहात तुफान हशा पिकला. पाहा त्याचा व्हिडीओ-
दरम्यान, भारतीय संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचला. तेथे त्यांचे स्नेहभोजन झाले. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यानंतर सायंकाळी संघ मुंबईत दाखल झाला आणि मरिन ड्राईव्हवर त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. अखेर गुरुवारी रात्री वानखेडे मैदानावर मोठा जल्लोष सोहळा पार पडला. त्यावेळी BCCIने भारतीय संघाला १२५ कोटींच्या बक्षिसाचा धनादेश सुपूर्द केला.