Join us  

Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs SL 3rd ODI: रोहित-गंभीरची अग्निपरीक्षा! याआधी सचिन कर्णधार असताना श्रीलंकेने केला होता भारताचा पराभव

Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs SL 3rd ODI: किती वर्षांपूर्वी ओढवली होती पराभवाची नामुष्की, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 6:59 PM

Open in App

Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs SL 3rd ODI: भारतीय संघाचा श्रीलंका दौरा आता संपत आला आहे. सुरुवातीला भारताने टी२० मालिका ३-० अशी जिंकली. मालिकेतील शेवटचा सामना टाय झाला होता. पण भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला. यानंतर सुरु झालेल्या वनडे मालिकेसाठी भारताचे दिग्गज फलंदाज संघात आले. पण या मालिकेत पहिला सामना बरोबरीत सुटला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली. त्यामुळे आता श्रीलंकेचा सामना १-० ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत भारतापुढे मालिका पराभवाचे संकट उभे ठाकले आहे. भारताचा संघ श्रीलंकेशी शेवटची वनडे मालिका केव्हा हरला होता, जाणून घेऊया.

गौतम गंभीर आणि रोहित शर्मा या जोडीची ही पहिलीच एकत्रित क्रिकेट मालिका आहे. गौतम गंभीरच्या कोच पदाच्या कारकीर्दीतील ही पहिलीच वनडे मालिका आहे. अशा परिस्थितीत तब्बल २७ वर्षांनी भारतावर मोठी नामुष्की ओढवू शकते. १९९७ साली भारताने श्रीलंके विरूद्ध शेवटची वनडे मालिका हरली होती. त्यावेळी अर्जुन रणतुंगा हा श्रीलंकेचा कर्णधार होता तर भारताचे कर्णधारपद सचिन तेंडुलकर याच्याकडे होते. त्यानंतर आजपर्यंत भारत-श्रीलंका यांच्यात एकूण ११ वनडे मालिका खेळल्या गेल्या आहेत. या सर्व मालिकांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. सध्या सुरु असलेली मालिका भारत जिंकू शकणार नाही. कारण २ सामने झाले असून त्यात श्रीलंका १-०ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवता येऊ शकते.

फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारत या मालिकेत अशा परिस्थितीत आहे. आर प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंना खूप मदत करत असून कर्णधार रोहित शर्मा वगळता अन्य कोणताही भारतीय फलंदाज श्रीलंकेच्या फिरकीपटूंची धुलाई करू शकलेला नाही. स्टार फलंदाज विराट कोहलीला आतापर्यंत दोन सामन्यांत केवळ ३८ धावा करता आल्या आहेत. ही संघासाठी चिंतेची बाब आहे. शेवटच्या सामन्यात त्याची भरपाई करण्याचा कोहली पूर्ण प्रयत्न करेल. कोहलीला रोहितकडून मिळालेली आक्रमक सुरुवात पुढे यशस्वीपणे नेण्याची गरज आहे. तसे झाल्यास चित्र वेगळे दिसू शकेल.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकागौतम गंभीररोहित शर्मासचिन तेंडुलकर