Virat Kohli, Rohit Sharma Press Conference, India vs West Indies: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि विद्यमान कर्णधार रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याच्या चर्चा कायम सुरू असतात. मैदानात आणि मैदानाबाहेर विराट आणि रोहित यांनी वारंवार हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांच्यात कोणताही वाद नाही. पण तरीदेखील विराट आणि रोहित यांना प्रत्येकवेळी एकमेकांविषयी प्रश्न विचारून बोलतं करण्याची संधी पत्रकार मंडळी कधीही सोडत नाहीत. रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी२० मालिकेआधी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्याला पुन्हा एकदा विराटबद्दल प्रश्न विचारला गेला, त्यावेळी रोहितने थोडंसं संतापूनच त्या प्रश्नाचं उत्तर दिलं.
विराट कोहलीचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे का? त्याला संघात स्थान देण्याबाबत नक्की काय विचार केला जात आहे? अशा आशयाचा सवाल रोहित शर्माला विचारण्यात आला. त्यावेळी रोहितने पत्रकारांनाच धारेवर धरलं. "तुम्ही मिडियावाले लोकं जरा गप्प बसलात तर खूप बरं होईल आणि गोष्टी आपोआप सुधारतील. मी विराटला रोज भेटतोय आणि मला असं वाटतं की तो सध्या खूप चांगल्या मनस्थितीत असून आगामी क्रिकेट सामन्यांसाठी सकारात्मक विचार करतो आहे. गेल्या दहा वर्षांपेक्षाही अधिक काळ तो या भारतीय संघाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे दडपणाचे क्षण किंवा दबावाचे प्रसंग कशा पद्धतीने हाताळायचे हे त्याला नीट माहिती आहे", असं रोहित शर्माने उत्तर दिलं.
सध्या संघात कोणत्याही खेळाडूला स्थान देण्यामागे अशी योजना आहे की आगामी टी२० वर्ल्डकपसाठी संघबांधणी केली जावी. वर्ल्डकपचा महिना येईपर्यंत कोण फिट असेल, कोण नसेल हे तर मलाही माहिती नाही. भारतीय संघाचं वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. आणि क्रिकेट म्हटलं की दुखापती व्हायच्याच. त्यामुळे जे खेळाडू संघात खेळत असतील त्यांना योग्य संधी मिळते की नाही यावर आमचं लक्ष असणार आहे. सर्व खेळाडूंना आपापली भूमिका स्पष्टपणे समजावण्यात आली आहे. आता त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे त्यांनीच ठरवलं पाहिजे", असं सूचक विधानही रोहित शर्माने केलं.