Join us  

Rohit Sharma, IND vs SL 1st ODI: अर्धशतक ठोकताच झाला भावूक, आकाशाकडेही पाहिलं... जाणून घ्या यामागचं कारण

रोहितने केली ८३ धावांची दमदार खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 4:31 PM

Open in App

Rohit Sharma Emotional Team India, IND vs SL 1st ODI: भारताने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरूद्ध टी२० मालिका २-१ने जिंकली. आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे. मालिकेतील सलामीचा सामना बारसापारा स्टेडियमवर खेळवला जात असून या सामन्यासाठी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी२० मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल या तिघांना विश्रांती देण्यात आली होती. पण वन डे मालिकेत संघातील वरिष्ठ खेळाडूंनी पुनरागमन केले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने दमदार ८३ धावांची खेळी केली. त्याचे शतक हुकले, पण अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने केलेली कृती विशेष चर्चेत राहिली.

पहिल्या वन डे मध्ये इशान किशनला संघाबाहेर केल्यानंतर, रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी सलामीला आली. दोघांनीही संघाला चांगली सुरूवात करून दिली. शुबमन गिल आणि रोहित शर्मा या जोडीने श्रीलंकन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घ्यायला सुरूवात केली होती. रोहितने दमदार अर्धशतक ठोकले. यावेळी त्याने चौकार षटकारांची बरसात केली. रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध अवघ्या ४० चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले, जे त्याचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४७वे अर्धशतक ठरले. आपले अर्धशतक पूर्ण करताच तो थोडा भावूक झालेला दिसला. त्याच्या पाळीव कुत्र्याचे सोमवारी, ९ जानेवारीला निधन झाले. हे अर्धशतक त्याने आपल्या पाळीव कुत्र्याला समर्पित केले.

गुवाहाटी येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकन ​​संघाचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि संघाला कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. शुभमन गिल ७० धावा करून बाद झाला. त्याने तब्बल ११ चौकार मारले. तर सामन्यामध्ये रोहित शर्माने ६७ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८३ धावा केल्या. त्याला दिलशान मदुशंकाने बाद केले.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माशुभमन गिलविराट कोहली
Open in App