मोहाली - भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणा-या रोहित शर्मासाठी आजचा दिवस खूप खास आहे. कर्णधारपदाच्या दुस-याच सामन्यात रोहित शर्माने द्विशतक ठोकलं आहे. फक्त 153 चेंडूत रोहितने 208 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 13 चौकार आणि 12 षटकार ठोकले. महत्वाचं म्हणजेच आजच रोहित शर्माच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मोहालीत सुरु असलेला हा सामना पाहण्यासाठी रोहितची पत्नी रितिका उपस्थित आहे. द्विशतक लगावत रोहित शर्मा पत्नी रितिकाला लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आहे. 13 डिसेंबर 2015 ला रोहित शर्मा गर्लफ्रेंण्ड रितिकासोबत लग्न बंधनात अडकला होता. मुंबईत हा लग्नसोहळा पार पडला होता. रोहितने शतक ठोकल्यानंतर पत्नी रितिकाला फ्लाईंग किस दिला. यावेळी रितिकालाही अश्रू अनावर झाले होते.
पहा व्हिडीओ
रोहित शर्मा याचाही साखरपुडा चांगलाच चर्चेत होता. कारण त्याने त्याचा साखरपुडा फिल्मी स्टाईलने केला होता. रोहितने त्याच्या वाढवदिवसाच्या २ दिवसांनंतर बोरीवलीच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये रितिकाला प्रपोज केलं होतं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांसमोरच रोहितने रितिकाला अंगठी घातली होती. रितिका ही मुंबईतच राहणारी असून दोघे ६ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी सपशेल फेल गेली होती. मात्र आजच्या सामन्यात भारतीय फंलदाजांनी चांगलाच वचपा काढला. सुरुवातीला शिखर धवन आणि नंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने अक्षरक्ष: गोलंदाजांना धुतलं. हिटमॅन रोहित शर्माने तुफान फलंदाजी करत आपलं तिसर द्विशतक साजरं केलं. शॉट मारेन तिथे सिक्स अशी परिस्थिती मैदानात झाली होती. श्रेयस अय्यरने 70 चेंडूत 88 धावा केल्या तर शिखर धवनने 67 चेंडूत 68 धावा ठोकल्या. रोहित शर्माच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने श्रीलंकेसमोर 393 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक ठोकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. दरम्यान भारतीय कर्णधाराने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. याशिवाय भारतीय संघाने मोहालीमधील सर्वोच्च 351 धावसंख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. भारताने तीन विकेट्स गमावत 392 धावा केल्या.
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय चांगलाच अंगलट आला. भारतासाठी हा सामना 'करो या मरो' आहे. पहिल्या वन-डेमध्ये भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने भारतीय संघ आज मैदानात उतरला आहे असे भारताच्या फलंदाजीकडे पाहून वाटत होते. या सामन्यातून वॉशिंग्टन सुंदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वॉशिंग्टन सुंदर अवघा 18 वर्षांचा आहे.