भारतीय संघाने आशिया चषक २०२३ जिंकला. आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण, या मालिकेपूर्वी रोहित शर्माने मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांच्या फिटनेसवर मोठे अपडेट दिले.
श्रीलंकेविरुद्ध आशिया कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अय्यर आणि अक्षर यांच्या फिटनेसबद्दल सांगितले की, अय्यर आतापर्यंत ९९ टक्के तंदुरुस्त आहे आणि तो सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. अक्षरला किरकोळ दुखापत झाली आहे, परंतु तो १आठवडा किंवा १० दिवसांत पूर्णपणे बरा होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी तो तयार आहे, असे मी सध्या म्हणू शकत नाही. माझ्या मते, अक्षर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या २ सामन्यांमधून बाहेर राहू शकतो.''
अय्यरबद्दल सांगायचे तर आशिया चषकमधील सुपर ४ सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याच्या पाठीत जडपणा आला होता. त्यामुळे अय्यरला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवता आले नाही. अक्षर १५ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध फलंदाजी करत असताना खेळाडूने फेकलेला चेंडू त्याच्या हाताला लागला. त्यामुळे तो आशिया कपमधून बाहेर पडला आणि त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज सिराजने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात ६ विकेट घेतल्या. त्यामुळे श्रीलंकेचा संघ ५० धावांवर बाद झाला आणि भारताने एकही विकेट न गमावता ६.१ षटकांत ५१ धावा केल्या. आता टीम इंडिया वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्याची सुरुवात २२ सप्टेंबरला होईल, तर शेवटचा सामना २७ सप्टेंबरला खेळवला जाईल.