Rohit Sharma, IND vs NZ 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला कालपासून सुरुवात होणार होती. पावसामुळे खेळाचा पहिला दिवस पूर्णपणे वाया गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्माचा निर्णय चुकला आणि पहिल्या तासाभराच्या खेळात भारताचे ३ खेळाडू बाद झाले. रोहित शर्मा (२), विराट कोहली (०) आणि सर्फराज खान (०) तिघेही स्वस्तात बाद झाले. रोहित शर्मा हा आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. स्वत:च्या रेकॉर्ड्सचा विचार न करता तो संघासाठी खेळतो अशी भावना रोहितच्या खेळीकडे पाहून अनेकांनी व्यक्त केली होती. पण आज रोहित अवघ्या २ धावांवर बाद झाल्याने चाहते त्याच्यावर भलतेच नाराज झाले.
बांगलादेश विरूद्धची मालिका भारताने २-० ने जिंकली. या मालिकेत रोहितला ४ पैकी ३ डावांत दुहेरी धावसंख्या गाठता आली नव्हती. त्यामुळे या मालिकेत तरी रोहित खेळपट्टीवर दीर्घकाळ टिकून खेळायचा प्रयत्न करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण न्यूझीलंडचा अनुभवी टीम सौदी याच्या इनस्विंगर चेंडूवर रोहित क्लीन बोल्ड झाला. विशेष म्हणजे रोहित तो चेंडू क्रीजवर पुढे चाल करत येऊन टोलवायच्या प्रयत्नात होता. सुरुवातीच्या वेळेत चेंडू स्विंग होणार याची कल्पना असूनही रोहित ज्याप्रकारे बाद झाला त्यावरून चाहते संतापले. ( रोहित शर्मा विकेट व्हिडीओ )
रोहित स्वस्तात बाद होताच चाहत्यांनी त्याच्यावर टीका केली. एकाने लिहिले, "रोहितने स्वत:ची विकेट दान करून टाकली. याला आक्रमक क्रिकेट नव्हे तर बेजबाबदार क्रिकेट म्हणतात." दुसऱ्याने म्हटले, "बीसीसीआयने रोहितला संघाबाहेर काढावे कारण तो युवा खेळाडूंची जागा वाया घालवतोय." तिसऱ्या युजरने खोचक टीका केली. "युवा खेळाडूंना जास्त खेळायला मिळाव म्हणून रोहित लवकर बाद होतोय," असा टोला त्याने लगावला. आणखी एकाने लिहीले, "आता ही बाब पक्की झाली की रोहित कॅप्टन्सी कोट्यातूनच संघात खेळतोय."
दरम्यान, आता इतक्या टीकेनंतर रोहित पुढच्या डावात आपली रणनीती बदलतो का, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल.