नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतीय संघाने पाकिस्तानला (IND vs PAK) चितपट करून विजयी सलामी दिली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ बुधवारी 31 ऑगस्ट रोजी हॉंगकॉंगला भिडणार आहे. या सामन्यात देखील विजय मिळवून सुपर 4 मध्ये स्थान पक्के करण्यासाठी रोहित सेना मैदानात उतरेल. हॉंगकॉंगविरूद्ध विजय मिळताच रोहित शर्मा आणखी एक विक्रम रचेल आणि विराट कोहलीला मागे टाकेल. भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याचा हा विक्रम आहे.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत एकूण 36 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 6 वेळा संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तर तब्बल 30 वेळा रोहितच्या नेतृत्वात संघाने विजय मिळवला. विराट कोहलीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 50 मधील 30 सामने जिंकले आहेत. जर उद्या देखील भारताचा विजय झाला तर रोहित भारताकडून सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा दुसरा यशस्वी कर्णधार बनेल. एक कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. या माजी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारताने 72 पैकी 41 सामने जिंकले आहेत.
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार
- महेंद्रसिंग धोनी - 41 विजय
- विराट कोहली - 30 विजय
- रोहित शर्मा - 30 विजय
भारताची विजयी सलामीभारताने पाकिस्तानचा पराभव करून आशिया चषकात विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्वबाद 147 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. संघाचा सलामीवीर फलंदाज के.एल राहुल आपल्या पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला. त्याला टी-२० मध्ये पदार्पण केलेल्या नसीम शाहने बाद केले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. किंग कोहलीने मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करून ३५ धावांची साजेशी खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने प्रभावशाली २९ चेंडूंत ३५ धावांची खेळी केली, तर विराट कोहली (३५), रोहित शर्मा (१२), सूर्यकुमार यादव (१८) आणि हार्दिक पांड्याने नाबाद ३३ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.