Rohit Sharma on KL Rahul Rishabh Pant in Team India, IND vs SL 1st ODI: भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यातील पहिला टप्पा जिंकला. ३ सामन्यांची टी२० मालिका भारताने ३-० अशी जिंकली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांचीही ही पहिलीच मालिका होती. या मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत निर्भेळ यश मिळवले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्ती घेतल्यापासून हा भारताचा पहिलाच टी२० दौरा होता. आता उद्यापासून भारताची वनडे मालिका सुरु होणार असून, त्यासाठी भारताचे बडे खेळाडू संघात दाखल झाले आहेत. विराट, रोहितसह केएल राहुल, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर हेदेखील श्रीलंकेत खेळताना दिसणार आहेत. मात्र, मैदानात उतरण्याआधी भारतीय संघापुढे एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. त्या प्रश्नाच आज रोहित शर्माने उत्तर दिले.
रोहित शर्माने श्रीलंकेशी वनडे मालिका खेळण्याआधी श्रीलंकेत एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की, वनडे सामन्यात यावेळी यष्टीरक्षक म्हणून केएल राहुल की रिषभ पंत? पत्रकारांच्या या प्रश्नाला रोहितने अतिशय समंजसपणे उत्तर दिले. "मला माझ्या मुख्य प्रशिक्षकांशी याबाबत चर्चा करावी लागेल. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर उद्याच मिळेल जेव्हा आम्ही सामना खेळायला मैदानात उतरू," असे रोहित म्हणाला.
राहुल आणि पंत यांच्यातील एकाची निवड करायची असल्यास तू कुणाला निवडशील? असा सवाल रोहितला करण्यात आला. त्यावर तो म्हणाला, "दोघांमधून एकाची निवड करणे कठीण आहे. दोघेही अतिशय उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत. दोघांनीही आपापल्या पद्धतीने वेळोवेळी संघाला विजय मिळवून दिला आहे. दर्जेदार खेळाडूंचा भरणा असताना संघ निवड करण्यात येणाऱ्या अडचणी मी सकारात्मक पद्धतीने घेतो. कुणाला संघात घ्यायचे आणि कुणाला बाहेर ठेवायचे या खूप वेळ चर्चा करावी लागणे म्हणजेच संघ प्रतिभावान आहे."
भारताचा वन डे संघ:- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
वन डे मालिकेचे वेळापत्रक:-
- पहिला सामना - २ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.
- दुसरा सामना - ४ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.
- तिसरा सामना - ७ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.