Rohit Sharma, IND vs SL 2nd Test: भारत दौऱ्यावर आल्यापासून श्रीलंकेचा संघ आपल्या खेळाडूंच्या फिटनेसच्या समस्येने सतत त्रस्त आहे. टी२० मालिकेत दुखापतीमुळे महत्त्वाचे खेळाडू गमावल्यानंतर श्रीलंकेला कसोटी मालिकेतही याचा सामना करावा लागला. बंगळुरू येथे सुरू असलेल्या डे-नाईट कसोटीच्या (Pink Ball Test) दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमाला (Praveen Jayawickrama) दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावं लागलं.
दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताचा दुसरा डाव सुरू झाला. डावाच्या सातव्या षटकात जयविक्रमने रोहित शर्माच्या शॉटवर चेंडू रोखला पण या प्रयत्नात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यामुळे त्याचा गुडघा दुखावला. श्रीलंकेच्या संघाच्या फिजिओने जयविक्रमाची तपासणी केली आणि त्यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. दोन खेळाडूंच्या मदतीने जयविक्रमने कशाबशा पॅव्हेलियनच्या पायऱ्या चढल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज जयविक्रमाला झालेल्या दुखापतीमुळे श्रीलंकेच्या गोलंदाजीतील एक पर्याय कमी होण्याची शक्यता होती. पण तो काही वेळाने मैदानात आला आणि तो गोलंदाजीही करणार असल्याचं सांगण्यात आलं.
जयविक्रमने पहिल्या डावात भारतीय संघाला मोठा धक्का दिला होता. त्याने हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यरसह एकूण ३ बळी टिपले होते. या कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झालेला जयविक्रम हा पहिला श्रीलंकन खेळाडू नाही. मोहाली कसोटी सामन्यात त्याच्या आधी, वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. तो पुन्हा गोलंदाजी करू शकला नाही. त्याच वेळी दुसऱ्या कसोटीच्या दोन दिवस अगोदर फलंदाज पथुम निसांकालाही पाठीच्या समस्येमुळे बंगळुरू कसोटीतून माघार घ्यावी लागली होती.