Rohit Sharma IND vs SL 2nd Test Live Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरू येथे गुलाबी चेंडूची कसोटी खेळली जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा भारतीय संघ फलंदाजीला आला. त्यात कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावात आपल्याच चुकीने बाद झाला आणि गुलाबी चेंडू कसोटीत त्याचं शानदार अर्धशतक हुकलं.
रोहित शर्मा ४६ धावांवर असताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेल देऊन बसला. त्याचं अर्धशतक झालं असतं तर रोहित शर्मासाठी ते खूप खास ठरले असते. कारण त्याची कर्णधार म्हणून गुलाबी चेंडूची ही पहिलीच कसोटी आहे. त्यात अवघड खेळपट्टीवर अर्धशतक करणं हे त्याच्यासाठी विशेष ठरलं असतं.
पुन्हा तीच चूक...
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना दिसला. त्याने ७९ चेंडू खेळले आणि ४६ धावा केल्या. या दरम्यान रोहित शर्माने चार चौकार मारले. तसेच रोहित अनेकवेळा रिव्हर्स स्वीप खेळतानाही दिसला. रोहित शर्मा या मालिकेत कोणतीही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. तो पुन्हा पुन्हा तीच चूक करत आहे. रोहित शर्मा मोठा फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट बहाल करताना दिसला आहे. आजही तो षटकारासह अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला.
याआधी मोहाली कसोटीतही रोहित शर्मा चांगली फलंदाजी करत असताना शॉर्ट बॉलवर पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर बाद झाला होता. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाची कारकीर्द मोहाली कसोटीपासूनच सुरू झाली. पण कर्णधार झाल्यापासून त्याला मोठी खेळी करता आलेली नाही.