Rohit Sharma, IND vs SL Tests : भारतीय संघ श्रीलंकेविरूद्ध सध्या टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने गुरूवारी सहज जिंकला. मालिकेतील उर्वरित दोन सामने शनिवार आणि रविवारी खेळण्यात येणार आहेत. या मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघाविरूद्ध आज श्रीलंकेच्या संघाची घोषणा करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे, या संघात श्रीलंकेने तीन महिन्यांच्या कालावधीनंतर एका स्टार खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
सुपरस्टार खेळाडू श्रीलंकेच्या संघात परतला!
रोहित शर्माने कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी घेतल्यापासून ही त्याची पहिलीच मालिका असणार आहे. याच मालिकेत श्रीलंकेने एक मोठा डाव खेळत तब्बल तीन महिन्यांनंतर आपला सुपरस्टार खेळाडू मैदानात उतरवला आहे. धोनीच्या घरच्या मैदानात भारतीय संघाचं कंबरडं मोडणारा अँजेलो मॅथ्यूज याला श्रीलंकेने संघात घेतलं आहे. त्याने रांचीच्या मैदानावर भारताविरूद्ध २०१४ साली नाबाद १३९ धावांची खेळी चाहत्यांच्या आजही लक्षात असेल. मॅथ्यूज शेवटचा सामना डिसेंबर २०२१च्या सुरूवातीला खेळला होता. त्यानंतर तो आता तीन महिन्यांनी पुन्हा संघात आला आहे.
श्रीलंकेचा भारताविरूद्धचा कसोटी संघ-
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पाथुम निसंका, लाहिरू थिरिमने, धनंजया डी सिल्वा (उपकर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, चारिथ असलंका, निरोशन डिक्वेल्ला, चमिका करुणारत्ने, लाहिरु कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमीरा, विश्वा फर्नांडो, जेफ्री वँडरसे, प्रवीण जयविक्रमे, लसिथ एम्बुल्डेनिया, कुशल मेंडिस (फिटनेस पाहून निर्णय घेणार)
रमेश मेंडिस - दुखापतीमुळे मालिकेत सहभागी होणार नाही
अशी रंगेल कसोटी मालिका
भारत विरूद्ध श्रीलंका कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ४ ते ८ मार्च हा पहिला सामना मोहालीला होणार आहेत. तर दुसरा सामना १२ ते १६ मार्च दरम्यान बंगळुरू येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे, यातील दुसरा कसोटी सामना हा दिवस रात्र पद्धतीचा गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे.
भारताचा कसोटी संघ-
भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार, रवि अश्विन (फिटनेस पाहून निर्णय घेणार)