रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्याकडे बीसीसीआयनं ट्वेंटी-२० पाठोपाठ वन डे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय जाहीर केला. रोहितकडे आता ट्वेंटी-२० व वन डे संघाचे, तर विराट कोहलीकडे कसोटी संघाचे कर्णधारपद असणार आहे. ८ डिसेंबरला बीसीसीआय आणि निवड समितीनं रोहित शर्माची वन डे व ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. लोकेश राहुल हा संघाचा उपकर्णधार असणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहिततनं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद स्वीकारले अन् पहिल्याच मालिकेत टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकली. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वन डे मालिकेत रोहित संघाचे नेतृत्व करणार आहे.
वन डे संघाचा कर्णधार म्हणून रोहितनं १० सामन्यांत ७७.५७च्या सरासरीनं ५४३ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे. नाबाद २०८ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतानं १०पैकी ८ सामने जिंकले आहेत. आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी रोहित शर्मानं त्याच्या जबाबदारीबद्दल मोकळेपणानं मत व्यक्त केले. यावेळी त्यानं खेळाडूंना एक मोलाचा सल्लाही दिला. BCCI.TV ला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्मानं स्पष्ट मत व्यक्त केले.
तो म्हणाला,''भारताकडून क्रिकेट खेळताना मनावर दडपण असतंच... लोकं बरंच काही बोलत असतात मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक.. पण एक क्रिकेटपटू म्हणून, मी कर्णधार म्हणून नाही बोलत, तर खेळाडू म्हणून आपल्या कामावर लक्ष केंद्रीत ठेवणे हे ध्येय असायला हवं. लोक काय बोलतात त्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. त्यांच्या बोलण्यावर तुम्ही ताबा ठेवू शकत नाही. हे मी लाखोवेळा बोललो आहे.''
''मी संघातील प्रत्येक खेळाडूलाही हाच संदेश देऊ इच्छितो. महत्त्वाच्या स्पर्धेदरम्यान बोलणारी अनेक लोकं असतात, पण जे आपल्या हातात आहे त्यावरच लक्ष केंद्रीत करायला हवं. तुम्ही जो खेळ करत आलाय, तोच खेळ कायम राखायला हवा. त्यामुळे मैदानाबाहेर काय चर्चा सुरूय यापेक्षा आपण एकमेकांबद्दल काय विचार करतो हे महत्त्वाचे आहे. राहुल भाई हेच वातावरण संघात कायम राखण्याचा प्रयत्न करत आहेत,''असेही रोहित म्हणाला.
Web Title: Rohit Sharma, India's new white-ball captain, has opened up on taking up the new responsibility in an interview with bcci.tv.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.