Rohit Sharma Injured, Aus vs Ind 4th Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे दोन सामने बाकी आहेत. मालिकेतील हे दोन्ही सामने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मेलबर्नमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया भरपूर सराव करत आहे. फॉर्मशी झुंजत असलेला कर्णधार रोहित शर्माही नेट्समध्ये सराव करण्यासाठी आला. रविवारी, २२ डिसेंबरला तो संघासह दुसऱ्या सत्रासाठी मेलबर्न क्रिकेट मैदानावर पोहोचला. पण फलंदाजी करताना रोहित जखमी झाला. त्याआधी केएल राहुलला दुखापत झाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीला हे दोन बडे खेळाडू मुकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रोहितला दुखापत, फलंदाजी सोडून तंबूत परतला
मालिकेत आघाडी घेण्यासाठी टीम इंडियाने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर घाम गाळायला सुरुवात केली. पण दुसऱ्या सराव सत्रातून एक वाईट बातमी समोर आली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला. तो थ्रोडाउन स्पेशालिस्ट दयाचा सामना करत होता. यादरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. असे असतानाही भारतीय कर्णधाराने थोडा वेळ फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण वेदना असह्य झाल्यावर त्याने फलंदाजी सोडली. त्यानंतर रोहित आईस पॅक लावून खुर्चीवर बसलेला दिसला. यावेळी टीम फिजिओही त्याच्यासोबत होते.
रिपोर्टनुसार, ही दुखापत फारशी गंभीर नाही. पण गुडघ्याला सूज येऊ नये म्हणून फिजिओ खबरदारी घेत आहेत. याशिवाय बॉक्सिंग डे कसोटीला अजून ४ दिवस बाकी आहेत. त्यामुळे तोपर्यंत रोहित पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो असा अंदाज आहे.
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
रोहितच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. टीम इंडियाचे बहुतांश फलंदाज मैदानावर आधीच संघर्ष करत आहेत. रोहितदेखील आतापर्यंत ऑस्ट्रेलियात धावा करण्यात अपयशी ठरला आहे. यादरम्यान, आधी संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज केएल राहुल आणि आता भारतीय कर्णधार जखमी झाला आहे. पहिल्या नेट सत्रात राहुलच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्याचबरोबर मेलबर्नच्या मैदानाला फिरकीपटूंची मदत मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र या सामन्यापूर्वी संघाचा सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज अश्विनने निवृत्ती घेतली आहे. या सर्व गोष्टींमुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे.
Web Title: Rohit Sharma injured in net practice after KL Rahul captain quits batting will he miss Aus vs Ind 4th Test at MCG
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.