मुंबई, आयपीएल 2019 : पाच सामन्यांत तीन विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेला मुंबई इंडियन्सचा संघ विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी बुधवारी घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. मुंबई इंडियन्सने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर जोरदार सराव केला. पण, या सरावात कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना रोहितला झालेली दुखापत भारतीय संघाची चिंता वाढवणारी आहे.
सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणारा मुंबई इंडियन्सचा संघ बुधवारी किंग्स इलेव्हन पंजाबचा सामना करणार आहे. पंजाबनेही हैदराबादवर रोमहर्षक विजय मिळवला आहे आणि मुंबईसमोर ते आव्हान उभे करू शकतात. पंजाबच्या आव्हानाची कल्पना असलेल्या मुंबईच्या खेळाडूंनी वानखेडेवर कसून सराव केला. मात्र, सराव सत्रात रोहितला दुखापत झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रोहित लंगडत चालताना दिसत होता आणि त्याने सराव सत्रातूनही विश्रांती घेतली. धावण्याचा सराव करतान रोहितचा पाय मुरगळला आणि वेदनेने कळवळत त्याने मैदानावरच लोटांगण घातले. मुंबई इंडियन्सचे फिजिओ नितीन पटेल यांनी त्वरीत मैदानावर धाव घेत रोहितवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रोहित ड्रेसिंग रुममध्ये परतला. रोहितच्या दुखपतीबद्दल मुंबई इंडियन्सकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर भारतीय संघातील खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मुंबई इंडियन्सकडून खेळणारा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमहारच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यावेळी वैद्यकीय उपचारानंतर बुमराह मुंबई इंडियन्सच्या चमूत दाखल झाला होता.
मुंबईने बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांना सलग नमवून विजयी कूच केली आहे. दोन्ही संघांना मुंबईकरांनी कमी धावसंख्येच्या सामन्यात पराभूत केले असल्याने, पंजाबच्या फलंदाजांना मुंबईच्या तगड्या गोलंदाजीपुढे सावधपणे खेळावे लागेल. वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता भारतीय संघातील संभाव्य खेळाडूंना आयपीएल संघ मालकांनी पुरेशी विश्रांती द्यावी असा आदेश बीसीसीआयने दिला आहे. खेळाडूंवर पडणारा कामाचा ताण मोजण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा काम करत आहे.
Web Title: Rohit Sharma injured in Mumbai indian's practice session, Major injury scare for India ahead of World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.