IND vs SA ODI Series, Shikhar Dhawan in Team India: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. भारताने पहिली कसोटी जिंकली असून आणखी दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर भारत-आफ्रिका यांच्यात वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ आज जाहीर करण्यात आला. भारताच्या निर्धारित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा अद्याप तंदुरूस्त नाही, त्यामुळे त्याच्या जागी लोकेश राहुल याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. तसेच, जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले. या संघात तब्बल पाच महिन्यांनी भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याला संघात स्थान देण्यात आले. रोहित शर्माची दुखापत एका अर्थी शिखर धवनच्या पथ्यावर पडली.
रोहित शर्मा आफ्रिका दौऱ्यावर कसोटी संघाचा उपकर्णधार होता. मात्र सरावादरम्यान त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली. वन डे मालिकेच्या संघाची घोषणा होईपर्यंत रोहित फिट होईल अशी अपेक्षा होती, पण रोहित अद्यापही अनफिट असल्याने अखेर आज संघाची घोषणा करण्यात आली. रोहितच्या जागी सलामीवीर म्हणून शिखर धवनला संघात तब्बल पाच वर्षांनी स्थान देण्यात आले.
गेल्या काही मालिकांमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघे भारताचे पहिल्या पसंतीचे सलामीवीर झाले असल्याने शिखर धवनला संघात स्थान मिळणं कठीण होऊन बसलं होतं. तशातच ऋतुराज गायकवाड, इशान किशन हा नव्या दमाच्या खेळाडूंनी आपली चमक दाखवल्याने धवनची संघात परतण्याची आशा धूसरच झाली होती. पण रोहितच्या दुखापतीमुळे धवनला किमान १८ खेळाडूंच्या संघात स्थान मिळाले. असं असलं तरी ऋतुराज आणि इशान यांना डावलून शिखर धवनला Playing XI मध्ये संधी मिळणार का? हा प्रश्न सध्या तरी चर्चेत आहे.
आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताचा संघ- केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज