Rohit Sharma Injury Update, WTC Final 2023 IND vs AUS: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 7 जून रोजी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. ऑस्ट्रेलियासारख्या तुल्यबळ संघासोबत हा सामना इंग्लंडमध्ये रंगणार आहे. भारतीय खेळाडू अतिशय फ्रेश आणि चांगल्या मूडमध्ये दिसत आहेत. अशा स्थितीत यंदा भारताचा 10 वर्षे आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपेल, अशी अपेक्षा आहे. रोहित शर्माने देखील त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत १-२ ICC ट्रॉफी जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्याच दरम्यान एक टेन्शन वाढवणारी बातमी आल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला.
रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत
WTC फायनल आधी मंगळवारी भारतीय संघाच्या सराव सत्रादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली. रोहित शर्मा थ्रोडाऊन सरावात जखमी झाला. ओव्हलवर नेट सत्रादरम्यान थ्रोडाऊनमध्ये डाव्या हाताला दुखापत झाल्याने त्याला सरावातून माघार घ्यावी लागली. सरावादरम्यान रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. तो लगेच नेट्समधून बाहेर आला. भारतीय संघाचे फिजिओ कमलेश यांनी त्याच्यावर उपचार केले आणि दुखापतीवर टेप लावली.
पुन्हा नेट्समध्ये सराव नाही!
थोड्या वेळाने रोहितला बरे वाटले त्यामुळे त्याने नेट्समध्ये परत जाण्यासाठी हँडग्लोव्ह्ज घातले होते. पण नंतर खबरदारीचा उपाय म्हणून तसे न करण्याचा सल्ला त्याला फिजिओंनी दिला. त्यामुळे त्याने पुन्हा सराव न करण्याचा निर्णय घेतला. पण यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की दुखापत फार गंभीर नाही. मात्र या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. असे असले तरी दुखापतीचं गांभीर्य कमी असल्याने रोहित उद्याच्या सामन्यात संघाचे नेतृत्व करणार हे निश्चित आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाला रोहित?
"2013 पासून भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे प्रत्येक आयसीसी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ हा दुष्काळ कधी संपवणार, असा प्रश्न पडतो. सर्व खेळाडूंना माहित आहे की आम्ही काही वर्षांत काय जिंकले आणि काय जिंकले नाही. सध्या आमचे सर्व लक्ष या सामन्यावर आहे आणि आधी काय झाले आणि काय झाले नाही याचा विचार करणे व्यर्थ आहे. मला काही जेतेपदे जिंकायला आवडतील पण मला माझ्या संघावर जास्त विचार करून दबाव टाकायला आवडणार नाही. कर्णधार म्हणून प्रत्येकाला विजेतेपदे मिळवायची असतात. मला कर्णधार म्हणून एक किंवा दोन ICC ट्रॉफी भारतात आणायला आवडेल. पण मला माहित नाही की भविष्यात काय होईल," असे रोहितने स्पष्टपणे सांगितले.