IPL 2022 Mumbai Indians vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वातील आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्सचा संघ ( MI ) उशीरा चार्ज झालेला पाहायला मिळाला. आता गमावण्यासाठी काहीच नाही, मग खेळा बिनधास्त... हाच पवित्रा आज मुंबईच्या खेळाडूंनी स्वीकारला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा ( GT) सामना करताना कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) व इशान किशन यांची बॅट चांगलीच तळपली. दोघांनी आक्रमक सुरुवात करून देताना संघाला दमदार सुरूवात करून दिली. मधली फळी अपयशी ठरल्यानंतर टीम डेव्हिड व तिलक वर्मा यांनी डाव सावरताना गुजरातसमोर समाधानकारक आव्हान उभे केले.
रोहित व इशान किशन यांनी मुंबईला दमदार सुरूवात करून दिली. इशान डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळताना दिसला, तेच रोहित त्याच्या पुर्वीच्या फॉर्मात परतला. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने यंदाच्या पर्वातील पॉवर प्लेमधील सर्वोत्तम खेळी नोंदवली. मुंबईने पहिल्या 6 षटकांत 63 धावा चोपल्या. रोहितने मोहम्मद शमीने टाकलेला चेंडू गुडघ्यावर बसून सीमारेषेपार टोलवला अन् रणवीर सिंह आनंदाने जल्लोष करू लागला. रोहितने आज आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले. रोहितच्या नावावर 5807* धावा आहेत, तर वॉर्नर 5805 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत विराट कोहली 6499 व शिखर धवन 6153 धावांसह आघाडीवर आहेत. रोहितचे हे वादळ रोखण्यासाठी राशिद खानला आणले गेले आणि रोहितही त्याला रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात LBW झाला. रोहितने 28 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 43 धावा केल्या.
रोहितने पहिल्या विकेटसाठी इशानसह 45 चेंडूंत 74 धावा जोडल्या. इशानने पवित्रा बदलताना फटकेबाजी सुरू केली आणि सूर्यकुमार यादवनेही त्याला उत्तम साथ दिली. प्रदीप सांगवानच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार ( 13) झेलबाद झाला. मुंबईला 99 धावांवर दुसरा धक्का बसला. त्यानंतर अल्झारी जोसेफने चतुर गोलंदाजी करताना इशानची विकेट मिळवली. इशान 29 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 45 धावांवर बाद झाला. अपयश किरॉन पोलार्डची पाठ काही सोडताना दिसत नाही. राशिद खानने अप्रतिम चेंडू टाकून पोलार्डची ( 4) दांडी गुल केली. राशिदने त्याच्या 4 षटकांत 24 धावा देत 2 विकेट्स घेतल्या व 3 कॅचही टिपले.
टीम डेव्हिड व तिलक वर्मा यांनी मुंबईचा गडगडत जाणारा डाव सावरला. या दोघांनी सुरेख फटकेबाजी मारली. डेव्हिडने 18व्या षटकात जोसेफला मारलेला स्ट्रेट सिक्स डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. 21 चेंडूंत 37 धावांची ही भागीदारी तिलक वर्माच्या ( 21) रन आऊट होण्याने संपुष्टात आली. डेव्हिड 21 चेंडूंत 44 धावांवर नाबाद राहिला. मुंबईने 6 बाद 177 धावा केल्या.
Web Title: Rohit Sharma IPL 2022 MI vs GT Live Updates: Rohit Sharma, Ishan Kishan and tim david play brilliently, MI set 178 runs target to GT
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.