मुंबई: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला यंदाच्या हंगामात आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. मुंबईला आठ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या स्थानी म्हणजेच तळाला आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकही संघ सलग आठ सामन्यांत पराभूत झाला नव्हता. मात्र हा लाजिरवाणा विक्रम मुंबईच्या नावावर जमा झाला आहे.
मुंबईच्या अतिशय सुमार कामगिरीमुळे रोहित शर्मावर टीका होत आहे. रोहित शर्मा मुंबईचं कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे. रोहितनं एक भावुक ट्विट केलं आहे. त्यामुळे कर्णधारपद सोडण्याची शक्यता बळावली आहे. 'आम्ही या हंगामात सर्वोत्तम कामगिरी केली नाही. मात्र असं होत राहतं. अनेक दिग्गज खेळाडू अशा टप्प्यातून गेले आहेत. मात्र मी या संघावर प्रेम करतो. या संघावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्या शुभचिंतकांचे आभार मानतो,' असं रोहितनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
रोहितचं ट्विट वाचून त्याचे आणि मुंबईचे चाहते भावुक झाले. अनेकांनी रोहितच्या समर्थनार्थ कमेंट्स केल्या. हार जीत टीमचा, खेळाचा भाग आहे. आम्ही रोहितच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. ३४ वर्षांच्या रोहितची बॅट यंदाच्या आयपीएलमध्ये तळपली नाही. ८ सामन्यांत १९.१३ च्या सरासरीनं त्याला केवळ १५३ धावाच करता आल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १२६.४५ आहे. तर सर्वोच्च धावसंख्या ४१ आहे.