नवी दिल्ली : वन डे विश्वचषकासाठी ३० दिवसांहून कमी कालावधी उरला आहे. आगामी विश्वचषक भारतात होत असल्याने यजमान संघाला स्पर्धेचा प्रमुख दावेदार मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज आपापाली मतं मांडत आहेत. भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगने देखील आगामी विश्वचषकाबद्दल भाष्य केले असून भारतीय संघातील जमेच्या बाजूंवर प्रकाश टाकला आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने शेवटच्या वेळी २०११ मध्ये विश्वचषकाचा किताब उंचावला होता. युवराज सिंगच्या म्हणण्यानुसार, विद्यमान भारतीय संघाचा कर्णधार (रोहित शर्मा) चांगला आहे, पण आपल्याला आगामी स्पर्धेसाठी एक तगडा संघ देखील उतरावा लागेल. धोनी एक चांगला कर्णधार होताच शिवाय त्याच्यासोबत अनुभवी खेळाडूंची फळी देखील होती. सध्याच्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल आणि मोहम्मद शमी हे अनुभवी खेळाडू आहेत, ज्यांनी २०१९ चा विश्वचषक खेळला आहे. केवळ अनुभवी खेळाडू असून चालणार नाही तर सामना जिंकून देण्याची क्षमता असलेले युवा खेळाडू देखील अधिक प्रभावी ठरतील, असेही युवीने नमूद केले. तो 'क्रिकेट बासू'शी बोलत होता.
मागील काही कालावधीपासून भारतीय संघात दुखापतीची मालिका सुरू आहे. संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीने ग्रस्त आहेत. वेगवान गोलंदाज मोठ्या कालावधीनंतर आयर्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून पुनरागमन करत आहे.
रोहितला एका चांगल्या संघाची गरज - युवी
"आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचे यशस्वी नेतृत्व केल्यामुळे रोहित एक चांगला कर्णधार बनला आहे. दबाव कसा हाताळावा हे त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यामुळे त्याला एका चांगल्या संघाची गरज आहे. असा संघ जो धोनीच्या नेतृत्वात विश्वचषक खेळला होता. धोनी चांगला कर्णधार होताच पण त्याच्यासोबत एक तगडा संघ देखील होता हे विसरून चालणार नाही", असेही युवराज सिंगने आणखी म्हटले.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू
Web Title: Rohit Sharma is a good captain, but to win the ODI World Cup, we need a team as tough as MS Dhoni's, says former India all-rounder Yuvraj Singh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.