Indian cricket in good hands: विराट कोहलीनं सप्टेंबर महिन्यात ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मागील महिन्यात BCCI ने त्याच्याकडून वन डे संघाचे कर्णधारपदही काढून घेतले. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी पराभवानंतर विराटनं कसोटी संघाचेही नेतृत्व सोडले. आता भारताच्या वन डे व ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्याकडे सोपवले आणि कसोटी संघाची जबाबदारीही त्याच्याकडेच जाण्याची शक्यता आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात असल्याचे मत वर्ल्ड कप विजेता कर्णधार डॅरेन सॅमी ( Daren Sammy) यानं व्यक्त केलं.
वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधारानं रोहितला महेंद्रसिंग धोनीसोबत बसवलं. धोनी ज्या प्रकारे एखाद्या खेळाडूकडून सर्वोत्तम खेळ करून घ्यायचा, तेच गुण रोहितमध्येही असल्याचे मत त्यानं व्यक्त केलं. दुखापतीमुळे रोहितला आफ्रिका दौऱ्यावर जाता आले नव्हते, परंतु आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे.
''विराट कोहलीची मैदानावरील कामगिरी सर्वोत्तम झाली आहे. आता त्याच्या कर्णधार नसल्यानं संघावर कोही परिणाम होईल, असे नाही वाटत. रोहितनं मुंबई इंडियन्सला पाच आयपीएल जेतेपदं पटकावून दिली आहेत. तो प्रेरणादायी कर्णधार आहे. आयपीएलमध्ये त्याचे नेतृत्वकौशल्य मी पाहिले आहे,''असे सॅमी म्हणाला.
३८ वर्षीय सॅमीनं पुढे सांगितले की,''रोहित आपल्या सहकाऱ्यांकडून चांगली कामगिरी करून घेऊ शकतो. त्यामुळेच तो आयपीएलमधील यशस्वी कर्णधार आहे. भारतीय क्रिकेटची चिंता अजिबात वाटत नाही आता ते सुरक्षित हातात आहे.''
भारत-वेस्ट इंडिज मालिकेबद्दल सॅमी म्हणाला, किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजचा संघ यजमानांसमोर कडवे आव्हान उभं करेल. वेस्ट इंडिजनं आयर्लंडविरुद्धची वन डे मालिका गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. पोलार्ड भारताविरुद्ध संधीचा फायदा नक्की उचलले. त्याच्याकडे भारतीय खेळपट्टींवर खेळण्याचा फार अनुभव आहे. ''