भारतीय संघाचे दोन सुपरस्टार रोहित शर्मा व विराट कोहली ( Rohit Sharma & Virat Kohli) यांच्यात नेहमी खेळीमेळीची स्पर्धा पाहायला मिळते. या दोघांच्या बॅटीतून येणारी प्रत्येक धाव ही चाहत्यांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. त्यामुळेच जगातील सर्वात घातकी फलंदाजांमध्ये टीम इंडियाचे हे दोन शिलेदार आघाडीवर आहेत. पण, यांच्यापैकी ग्रेट कोण? हा जरा वादाचा मुद्दा आहे आणि यावरून दोघांचेही फॅन्स बऱ्याचदा आमने सामने आलेले पाहायला मिळालेत. त्यात आता पाकिस्तानचा फलंदाज इमाम-उल-हक ( Imam-ul-Haq) याचं विधान ऐकून विराट चाहते नक्की संतापतील...
सोशल मीडियावर इमाम-उल-हकचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्या त्याने रोहित व विराट यांच्याबद्दल त्याचे प्रांजळ मत व्यक्त केले. पण, ते करताना त्याने विराटच्या फॅन्सना दुखावले आहे. तो म्हणाला, रोहित शर्मा हा गॉड गिफ्टेड खेळाडू आहे. ज्या प्रकारे तो खेळतो, ते पाहून असं वाटतं की त्याच्या फलंदाजीचा रिप्लेय सुरू आहे. त्याच्याकडे भरपूर वेळ असतो. रोहितची फलंदाजी पाहून मला टायमिंग काय असते हे पहिल्यांदा कळले.''
तो पुढेही हेही म्हणाला, जे टॅलेंट अल्लाहने रोहितला दिले आहे, ते विराट कोहलीला दिलेले नाही. मी दोघांनाही खेळताना पाहिले आहे. माझ्य़ासमोर रोहितनेही फलंदाजी केलीय अन् विराटनेही. पण, रोहितला अल्लाहने समयसुचकतेचं वरदान दिले आहे. तो असा खेळाडू आहे की दोन सेकंदात सामना फिरवू शकतो. तो सेट झाला की आपल्या मर्जीने फटकेबाजी करतो. त्यामुळे मलाही त्याच्यासारखं खेळता यावं, ही माझी इच्छा आहे.