Join us  

रोहित शर्मा बाहेर, बुमराहकडे नेतृत्व; कपिलदेव यांच्यानंतर ३५ वर्षांनी वेगवान गोलंदाज बनला कर्णधार

भारताने १९३२ ला पहिली कसोटी खेळली. तेव्हापासून कसोटीत देशाचे नेतृत्व करणारा बुमराह ३६ वा कर्णधार ठरला आहे. गुजरातच्या या वेगवान गोलंदाजाने २९ कसोटी सामन्यांत १२३ गडी बाद केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 10:23 AM

Open in App

नवी दिल्ली : नियमित कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा बुधवारी दुसऱ्यांदा कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने उद्या, शुक्रवारपासून (१ जुलै) इंग्लंडविवरुद्ध सुरू होत असलेल्या एजबस्टन कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याजागी २९ वर्षांचा वेगवान गोलंदाज जसप्रत बुमराह हा नेतृत्व करेल. कपिल देव यांच्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी एका वेगवान गोलंदाजाला भारताचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला, हे विशेष.लिसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान रोहितला कोरोनाची लागण झाली होती. बुधवारी त्याची दुसऱ्यांदा चाचणी झाली, त्यातही तो पॉझिटिव्ह आढळला. १ जुलैपासून होणारा कसोटी सामना हा यापूर्वी २०२१ मध्ये होणार होता, परंतु त्यावेळी इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यानंतर हा सामना पुढे ढकलण्यात आला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे.या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेदरम्यान बुमराहला भारताचा उपकर्णधार म्हणून बढती देण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत बुमराहने संधी मिळाल्यास कर्णधारपद स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले होते. बुमराहशिवाय ऋषभ पंत व विराट कोहली यांची नावे कर्णधारपदासाठी होती. कोहलीच्या चाहत्यांची या सामन्यात विराटलाच कर्णधारपद द्यावे, अशी इच्छा होती.

 ३६ वा कर्णधार  -भारताने १९३२ ला पहिली कसोटी खेळली. तेव्हापासून कसोटीत देशाचे नेतृत्व करणारा बुमराह ३६ वा कर्णधार ठरला आहे. गुजरातच्या या वेगवान गोलंदाजाने २९ कसोटी सामन्यांत १२३ गडी बाद केले आहेत. 

कपिलनंतर बुमराहबुमराह हा कपिलदेव यांच्यानंतर भारताचे कर्णधार भूषविणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरेल. मार्च १९८७ ला कपिलदेव यांच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आल्यानंतर ३५ वर्षांत दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, कृष्णम्माचारी श्रीकांत, मोहम्मद अजहरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड़, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी कसोटी संघाची धुरा सांभाळली आहे. 

विराट कोहलीचा नकार? रोहितच्या अनुपस्थितीत कोहलीच्या कर्णधारपदाची शक्यता होती. पण निवड समितीने बुमराहला निवडले. दुसरीकडे, ज्या पद्धतीने विराटकडून नेतृत्व काढून घेण्यात आले त्यावर तो निराश होता. आता स्वत:च्या फलंदाजीवर लक्ष देण्याची सबब देत त्याने व्यवस्थापनाकडे असमर्थता कळविलेली असावी. 

टॅग्स :जसप्रित बुमराहकपिल देवरोहित शर्मा
Open in App