Rohit Sharma Kieron Pollard Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK: "मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातील कामगिरी फारशी चांगली नाही. पण सर्वोत्तम खेळाडूंनादेखील अनेक वेळा दडपणाच्या स्थितीतून जावं लागतं. एक फटका संपूर्ण सामन्याचा कल बदलून टाकू शकतो. पण मला खात्री आहे की, अशा कठीण प्रसंगातून 'मुंबई इंडियन्स'ला बाहेर कसं काढायचं, हे रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्डसारख्या बड्या खेळाडूंना नीट माहिती आहे", असा विश्वास मुंबई इंडियन्सचा नवा गोलंदाज जयदेव उनाडकट याने व्यक्त केला. मुंबई संघाच्या वतीने त्याने आज पत्रकार परिषदेस हजेरी लावली आणि अनेक प्रश्नांना उत्तर देत संघाची पुढील रणनिती सांगितली.
टीम कॉम्बिनेश कसं असावं?
"आम्ही सध्या सर्वोत्तम टीम कॉम्बिनेशनच्या शोधात आहोत. संघात नक्की काय चुकतंय, याचा आम्ही शोध घेत आहोत. आम्हाला पहिल्या विजयाची गरज आहे. त्यानंतर सगळं नीट मार्गी लागेल अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आता आम्ही काही गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने करायच्या ठरवल्या आहेत", असे तो म्हणाला.
MI संघाचा पुढचा प्लॅन काय?
"मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सगळ्या प्रकारचे चढ-उतार पाहिले आहेत. आम्ही वाईट कामगिरीही पाहिली आहे. आम्ही विजेतेपदंही पटकावली आहेत. त्यामुळे सध्याच्या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आम्हाला आमचं डोकं शांत ठेवावं लागेल. पुढच्या प्रत्येक सामन्यात मैदानावर असलेल्या प्रत्येक खेळाडूला सर्वस्व पणाला लावावं लागणार आहे. दडपण असेल हे नक्की, पण त्या दडपणाच्या काळात तुम्ही किती शांतपणे परिस्थिती हाताळता, हे अधिक महत्त्वाचे आहे."
सचिन-जहीर यांच्याकडून खेळाडूंना काय सल्ला?
मैदानावर झटपट निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. दडपणाचा वापर चांगली कामगिरी करण्यासाठी करायला हवा. सचिन तेंडुलकर आणि जहीर खान हे दोघेही आम्हाला सांगतात की तुम्ही तुमच्यातील प्रतिभेवर विश्वास ठेवा आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यातून विजयाची वाट शोधा. त्यामुळे आमचे संघ व्यवस्थापन टीम कॉम्बिनेशन ठरवेल त्यानुसार आम्ही मैदानावर उतरणार आहोत", असेही त्याने स्पष्टपणे सांगितले.