कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या २ ऑगस्टपासून रंगणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकरच येथे सराव सत्रात सहभागी होतील. रोहित, कोहली आणि पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झालेला हर्षित राणा यांच्यासह एकदिवसीय संघातील खेळाडू रविवारी कोलंबो येथे पोहचले.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय टी-२० संघ पल्लेकल येथे मंगळवारी तिसरा टी-२० सामना खेळेल. यानंतर एकदिवसीय संघातही निवड झालेले खेळाडू रोहितच्या नेतृत्वाखालील संघाशी जुळतील. रोहित, कोहली आणि कुलदीप हे त्रिकुट टी-२० विश्वविजेतेपदानंतर पहिल्यांदाच मैदानावर उतरतील.
या मालिकेद्वारे श्रेयस अय्यरचेही एकदिवसीय संघात पुनरागमन होईल. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा मर्यादित षटकांचा सामना खेळला होता.
एकदिवसीय संघात निवड झालेले सर्व खेळाडू सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतील. श्रीलंकेविरुद्धचे तिन्ही एकदिवसीय सामने प्रेमदासा स्टेडियममध्ये २, ४ आणि ७ ऑगस्टला खेळविण्यात येतील.