Mumbai Indians Rohit Sharma, IND vs WI ODI Series: वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणून संघात परतला. पण मालिकेच्या काही दिवस आधी भारतीय संघाला कोविडचा फटका बसला. काही खेळाडूंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि नेट बॉलर नवदीप सैनी यांना किमान वन डे मालिकेला मुकावे लागणार आहे. भारताचा उपकर्णधार आणि सलामीवीर केएल राहुलही पहिल्या वन डे साठी उपलब्ध नसणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मयंक अग्रवालला संघात समाविष्ट केल्याची अधिकृत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर आता भारतीय संघात 'हिटमॅन'चा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मधला साथीदार इशान किशन (Ishan Kishan) हादेखील वन डे संघात दाखल झाला असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. त्यामुळे रोहित शर्मासोबत पहिल्या वन डे सामन्यात ओपनिंगला तो मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
डावखुऱ्या इशान किशनला वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी२० मालिकेत संघात घेण्यात आले होते. पण वन डे मध्ये सलामीवीर म्हणून पहिल्या पसंतीचे अनेक खेळाडू अनुपलब्ध झाल्याने किशनला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. इशान किशनने गेल्या वर्षी वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्यावहिल्या चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकून त्याने साऱ्यांनाच थक्क केलं होतं. त्याच सामन्यात त्याने वन डे पदार्पणात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही नोंदवला होता.
"इशाननेच रोहितबरोबर ओपनिंगला जावं"
“तुमच्याकडे पर्याय उरलेले नाहीत. तसंच ज्या खेळाडूंना संसर्ग झाला आहे, त्यामुळे तुमचा संघ थोडासा खचूही शकतो. त्यामुळे मला वाटतं की या साऱ्या घडामोडींकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहूया. जर इशान किशनने रोहित शर्मासोबत सलामी दिली, तर ते नक्कीच फायद्याचं होईल. इशान किशन हा स्ट्राइक रेटच्या बाबतीत नेहमीच पुढे असतो. अशा वेळी रोहित सेट व्हायला वेळ घेत असताना इशान पॉवर-प्लेचा योग्य फायदा संघाला मिळवून देऊ शकतो", असं मत माजी यष्टीरक्षक सबा करीम यांनी व्यक्त केलं.