गुवाहाटी-
भारत विरुद्ध श्रीलंका तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना उद्या गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या संघात परतणार आहे आणि त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. रोहित शर्मा अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर होता. आता एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्याच्या पूर्वसंध्येला रोहित शर्मानं पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरं दिली. यात ट्वेन्टी-२० करिअरमधील त्याच्या भविष्याबाबतही विचारण्यात आलं.
ट्वेन्टी-२० क्रिकेट सध्या तरी सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचं रोहित शर्मानं स्पष्ट केलं. हार्दिक पंड्यानं ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्व केलं. त्यामुळे आता रोहित फक्त एकदिवसीय आणि कसोटी संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळेल आणि ट्वेन्टी-२० संघाची धुरा हार्दिककडे सोपवली जाईल अशी चर्चा सुरू आहे. इतकंच नव्हे, तर रोहित शर्मासह संघातील इतर सिनिअर खेळाडूंना फक्त एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठीच निवडलं जाईल असंही म्हटलं जात आहे.
रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, "लागोपाठ सामने खेळणं शक्य नाही. तुम्ही तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना आवश्यक असा ब्रेक द्यावाच लागतो. माझाही यात समावेश आहे. आपल्या हातात फक्त ६ ट्वेन्टी-२० सामने आहेत. त्यातील ३ सामने आता संपले आहेत. आता न्यूझीलंडविरुद्ध तीन ट्वेन्टी-२० सामने आहेत. आता आयपीएलनंतर काय होईल ते पाहावं लागेल. ट्वेन्टी-२० फॉरमॅट सोडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही"