आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये आपण द्विशतकं पाहिली आहेत. पण कधी कधी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये संघाच्याही दोनशे धावा होत नाहीत. पण तरीही ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा एक फलंदाज द्विशतक झळकावू शकतो, असे भाकित एका माजी क्रिकेटपटूने केले आहे.
वनडे क्रिकेटमध्ये भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पहिले द्विशतक झळकावले होते. त्यानंतर काही द्विशतकं आपण वनडे क्रिकेटमध्ये पाहिली. त्यानंतर भारताच्या वीरेंद्र सेहवागने द्विशतक झळकावले होते. भारताच्या रोहित शर्माने तर आतापर्यंत तीनवेळा वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक लगावले आहे.
ट्वेन्टी-२० क्रिकेट म्हटलं की भारतीयांपुढे डोळ्यासमोर येतो तो २००७ साली झालेला पहिला विश्वचषक. त्याचबरोबर या विश्वचषकातील युवराज सिंगचे सहा षटकार कोणीही विसरू शकत नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण करणाऱ्या युववराज सिंगनेच एक भाकित वर्तवले आहे. यामध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू द्विशतक झळकावू शकतो, हे त्याने सांगितले आहे.
युवराज म्हणाला की, " वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपण काही द्विशतके पाहिली आहेत. पण ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणे सोपे नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक पूर्ण करणे अवघड असले तरी ते अशक्यप्राय नक्कीच नाही."
युवराज पुढे म्हणाला की, " क्रिकेट जगतामध्ये असे काही फलंदाज आहे की, ते ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतकही पूर्ण करू शकतात. माझ्यामते ख्रिस गेल आणि एबी डी' व्हिलियर्ससारखे खेळाडू ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावू शकतात. भारतामधून फक्त एकच खेळाडू ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावू शकतो आणि तो आहे रोहित शर्मा."