अबुधाबी - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध अपयशी ठरला. मात्र, त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात संर्व कसर भरून काढली. रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध ४७ चेंडूत ३ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने 74 धावा ठोकल्या. भारतीय संघाला जबरदस्त सुरुवात करून देते त्याने सलामीवीर केएल राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी केली. या खेळीच्या जोरावर रोहित शर्मा (Rohit sharma) ICC स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला.
रोहित शर्मानं जो रूट, विराटलाही टाकले मागे... -रोहित शर्माने आपल्या ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. आता तो आयसीसीच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकप, चॅम्पयिन्स ट्रॉफी, टी-२० वर्ल्डकप मिळून आतापर्यंत तब्बल ३ हजार ६८२ धावा ठोकल्या आहेत. या बाबतीत हिटमॅन रोहित शर्माने इंग्लंडचा कर्णधार जो रूटलाही मागे टाकले आहे. त्याने आतापर्यंत आयसीसी स्पर्धेत ३ हजार ६६२ धावा केल्या आहेत. तर याबाबतीत विराट कोहली ३ हजार ५५४ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Rohit sharma made the biggest record)
अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना रोहित आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १४० धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील ही भारताकडून पहिल्या विकेटसाठीची दुसऱ्या क्रमांकाची भागिदारी आहे. यापूर्वी रोहित आणि शिखर धवन यांनी १६० धावांची भागीदारी केली होती.
रोहित शर्माच्या आणि केएल राहुल यांच्या जबरदस्त सलामीच्या जोरावर, भारताने या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या दारुण पराभवानंतर अखेर विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानला धूळ चारत भारतानं स्पर्धेतील पहिलावहिला विजय नोंदवला. यामुळे भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत. मात्र भारताचे स्पर्धेतील आव्हान आता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.