मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक स्पर्धा जिंकली. पण त्यानंतरही वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहितला संघात स्थान देण्यात आले नाही. रोहितकडे भावी कर्णधार म्हणून बघायला लोकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळायला हवी होती, असे चाहत्यांना वाटत होते. पण रोहितला यावेळी संधी मिळाली नसली तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नक्कीच त्याचा समावेश करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारताचा जेव्हा इंग्लंडचा दौरा सुरु होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी, रोहितला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात रोहितला कसोटी संघात स्थान द्यायला हवे, असे सुतोवाच केले होते. रोहित हा एक गुणवान खेळाडू आहे आणि उसळत्या खेळपट्टीवर तो चांगली फलंदाजी करू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळेच रोहितला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रोहितने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो जगातला एकमेव फलंदाज आहे. पण तरीही त्याला कसोटी संघात आपले स्थान कायम राखता आलेले नाही. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला पुन्हा एकदा कसोटी सामने खेळायची संधी मिळू शकते.