नवी दिल्ली - श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांडया यांना विश्रांती देण्यात येऊ शकते. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामंक मंडळातील (बीसीसीआय) सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
या दौऱ्यात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. दोन महिन्यांपासून सुरु असलेला दक्षिण आफ्रिकेचा दौरा आज शनिवारी संपत आहे. या दौऱ्याचा व्यस्त कार्यक्रम लक्षात घेऊन संघातील आघाडीच्या क्रिकेटपटूंना विश्रांती देण्यात येईल. निवडकर्ते रविवारी श्रीलंकेतील तिरंगी मालिकेसाठी संघ निवडणार असून सहा नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
विजय हजारे करंडकातील दिल्ली-आंध्रप्रदेश सामन्यानंतर पालम क्रिकेट ग्राऊंडवर निवडसमितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि विकेटकिपर ऋषभ पंत यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यामुळे धोनीच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे.