Rohit Sharma May Be Miss Australia Series there a chance for Ajinkya Rahane : भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी होणाऱ्या या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. वैयक्तिक कारणामुळे तो संघासोबत दिसणार नाही. या परिस्थितीत भारतीय संघात कुणाला संधी मिळणार? हा मुद्दाही चर्चेचा विषय ठरताना दिसते. जर रोहित शर्मा संघाबाहेर पडला तर अजिंक्य रहाणेसाठी टीम इंडियात कमबॅक करण्याची एक शेवटची संधीही निर्माण होऊ शकते. इथं आपण जाणून घेऊयात रोहित शर्मा न खेळण्यामागचं नेमकं कारण काय? 'गूडन्यूज'चा योग पुन्हा अजिंक्य रहाणेसाठी फायद्याचा कसा ठरू शकतो यासंदर्भातील सविस्तर माहिती
रोहित माघार घेण्यामागचं नेमकं काय असू शकतं कारण?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेण्यामागचं कारण रोहित शर्मासाठी एकदम खास असल्याची चर्चाही रंगू लागली आहे. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिच्याकडे गूडन्यूज आहे. दुसऱ्यांदा बाबा होणार असल्यामुळेच रोहित शर्मा आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामन्यांना मुकण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. या गोष्टीला रोहित-रितिका यांनी अधिकृत दुजोरा दिला नसला तरी याच कारणास्तव तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील काही सामन्यांना तो मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजिंक्य रहाणेला मिळू शकते कमबॅकची शेवटची संधी अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाबाहेर आहे. त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले आहेत, अशी चर्चाही रंगत आहे. पण नुकत्याच झालेल्या इराणी कप स्पर्धेत त्याने आपल्या भात्यातील अन् कॅप्टन्सीतील धमक दाखवून दिलीये. त्याआधी इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्येही त्याने आपला जलवा दाखवला आहे. याशिवाय गत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया जो इतिहास रचला त्यात अजिंक्य रहाणेनं टीम इंडियाचं नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले होते. या सर्व गोष्टी पाहता अजिंक्य रहाणेचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विचार केला जाऊ शकतो.
'गूडन्यूज'चा योग पुन्हा अजिंक्य रहाणेसाठी कसा ठरेल फायद्याचा?
रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामन्याला मुकण्यासंदर्भात 'गूडन्यूज' हेच कारण असेल तर त्यामुळं आणखी एक कमालीचा योगायोग जुळून येतोय. भारतीय संघ मागच्या वेळी (२०२०-२१) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता त्यावेळी विराट कोहली टीम इंडियाचा कॅप्टन होता. त्यावेळी अनुष्का शर्माकडे 'गूडन्यूज' होती. त्यामुळे विराट कोहली पहिली ॲडलेड कसोटी खेळून मायदेशी परतला होता. उर्वरित ३ कसोटी सामन्यात अजिंक्यला नेतृत्वाची संधी मिळाली होती. आता रोहित-रितिका जोडीकडील 'गूडन्यूज' त्याच्यासाठी फायद्याची ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.
रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन्सीसह सलामीचे पर्याय
जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यांना मुकला तर अभिमन्यू ईश्वरन याला बॅकअप ओपनरच्या रुपात टीम इंडियात स्थान मिळू शकते. ऋतुराजगला मागे टाकून तो या शर्यतीत आघाडीवर आहे. यशस्वी जैस्वालसोबत शुबमन गिल किंवा लोकेश राहुल यांच्यावरही सलामीची जबाबदारी पडू शकते. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत उप कॅप्टनचा उल्लेखच करण्यात आला नव्हता. त्यामुळे आगामी न्यूझीलंड दौऱ्यावर उप कॅप्टनची धूरा कुणाकडे येणार त्यावरून रोहितच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची कॅप्टन्सी कोण करणार ते स्पष्ट होईल.