Asia Cup Final 2023 IND vs SL : भारत आणि श्रीलंका हे आशिया चषक २०२३ च्या फायनलमध्ये आज कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर लढण्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघ प्रतिष्ठेचे विजेतेपद जिंकण्याच्या दृष्टीने कडवी टक्कर देतील. भारत हा आशिया कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे, कारण त्यांच्या नावावर ७ विजेतेपद आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ गतविजेत्या श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून आठवे विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असेल.
फायनलपूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही भारतीय सलामीवीर लिफ्टबाहेर उभे असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये गिल रोहितला काहीतरी विचारतो आणि भारतीय कर्णधार उत्तर देतो, “अरे मेरे से नहीं होगा, पागल है क्या?' गिलने नेमकं काय विचारलं हे व्हिडीओतून स्पष्ट होत नाहीए.
दरम्यान, भारतीय संघाला आशिया चषक सुपर ४ मध्ये बांगलादेशविरुद्ध थोडक्यात पराभव पत्करावा लागला. आता भारताला फायनलमध्ये यजमान श्रीलंकेचा सामना करायचा आहे. बांगलादेशविरुद्ध टीम इंडियात ५ बदल पाहायला मिळाले होते. विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली गेली होती. ते फायनलमध्ये परतणार हे निश्चित आहे. श्रेयस अय्यर याच्या खेळण्यावर अजूनही संभ्रम आहे आणि त्यात अक्षर पटेलच्या दुखापतीची भर पडलीय. बांगलादेशच्या खेळाडूने फेकलेला चेंडू अक्षरच्या मनगटावर जोरात आदळला होता. त्यामुळे आता संघ व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून वॉशिंग्टन सुंदरला बोलावले आहे.