नवी दिल्ली : हिटमॅन रोहित शर्मा भारतीय क्रिकेटमधील सर्वात दोन महान कर्णधार एम.एस. धोनी व सौरव गांगुली यांचे मिश्रण आहे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने व्यक्त केले.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयीपएल) २०२० अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने संघाला पाचव्यांदा जेतेपद पटकावून दिले. एवढेच नव्हे तर त्याने अंतिम लढतीत जयंत यादवला स्थान देण्याचा निर्णय उपयुक्त ठरला. जयंतने फॉर्मात असलेल्या शिखर धवनला बोल्ड करीत दिल्लीवर सुरुवातीपासून वर्चस्व मिळवून दिले.
इरफान म्हणतो, ‘जसे रोहितने जयंत यादवचा वापर केला त्यावरून त्याच्या गुणवत्तेची कल्पना येते. एखाद्या कर्णधाराने वेगवान गोलंदाजाला संधी दिली असती, पण रोहितने मात्र तसे केले नाही. यावरून रोहित गोलंदाजांचा कर्णधार असल्याचे स्पष्ट होते. तो धोनी व गांगुलीचे मिश्रण आहे. गांगुलीने आपल्या गोलंदाजांवर विश्वास दाखविला धोनीसुद्धा तेच करीत होता.’
माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने एका सामन्याचे उदाहरण देताना सांगितले, ‘मला आठवते की एक सामना फसला होता आणि रोहितने जसप्रीत बुमराहला १७ व्या षटकात गोलंदाजी दिली. साधारणपणे बुमराह १८ व्या षटकात गोलंदाजी करतो. त्या लढतीत बुमराहने बळी घेतले आणि सामना मुंबई इंडियन्सने जिंकला. पोलार्डचाही त्याने चांगला वापर केला.’