India vs Pakistan, ODI World Cup 2023: भारतीय संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. सर्वच खेळाडू कसून तयारी करत आहेत. भारताच्या यंदाच्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या यांसारखे तुफान फटकेबाजी करू शकणारे फलंदाज आहेत. तसेच नव्याने संघात समाविष्ट झालेल्यांमध्ये शुबमन गिल, इशान किशन हे युवा फलंदाज आहेत. श्रेयस अय्यरनेही नुकतीच आपली फलंदाजीतील चमक दाखवली आहे. त्यामुळे भारताच्या फलंदाजी युनिटबद्दल प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरली नाही तरच नवल. याचदरम्यान पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने भारतीय संघातील सर्वाधिक धडकी भरवणारा फलंदाज कोण याबद्दल मत सांगितले आहे.
"आशिया कपमध्ये मी भारतीय संघाला खेळताना पाहिले आहे. मी आशिया कपमध्ये स्वत: खेळताना भारतीय फलंदाजांना गोलंदाजी केली आहे. माझ्या मते भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा मैदानात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना सर्वाधिक धडकी भरवतो. त्याच्या खेळीला आणि फटकेबाजीला सारेच जण घाबरतात. रोहित शर्माला गोलंदाजी करणे ही कुठल्याही गोलंदाजासाठी एक मोठी कसोटी असते. कारण तो जर एकदा पिचवर सेट झाला तर त्याच्याइतका धोकादायक फटकेबाजी करणारा फलंदाज कोणीच नाही", अशा शब्दांत पाकिस्तानचा लेगस्पिनर शादाब खानने हिटमॅनची स्तुती केली.
भारतीय संघातील सर्वात 'खतरनाक' गोलंदाज कोण?
भारतीय संघात सध्या मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर यासारखे वेगवान गोलंदाज आहेत. त्यांचा भेदक मारा कायमच प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवू शकतो. वन डे वर्ल्ड कपमध्ये भारताकडून अनुभवी फिरकीपटू आर अश्विनदेखील खेळणार आहे. पण शादाब खानच्या म्हणण्यानुसार, भारताच्या संघातील आताच्या घडीला सर्वात 'खतरनाक' गोलंदाज म्हणजे कुलदीप यादव. शादाब म्हणाला, "मी स्वत: एक लेगस्पिनर आहे. त्यामुळे मला कुलदीप यादवच्या गोलंदाजीबद्दल खूप आकर्षण आहे. गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवचा सध्याचा फॉर्म अप्रतिम आहे. त्याच्या गोलंदाजी सर्वत्र स्तुती होत आहे. पाकिस्तान विरूद्ध त्याने आशिया कपमध्ये अख्खा सामना फिरवला होता, त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचा मी चाहता झालो आहे", असेही शादाब म्हणाला.