Rohit Sharma mother shares throwback picture: आगामी विश्वचषक स्पर्धा २०२४ साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. T20 World Cup 2024 साठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्याशिवाय बहुतांश बड्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्मालामुंबई इंडियन्सच्या संघाने जरी कर्णधारपदावरून जरी दूर केले असले, तरी भारताच्या कर्णधारपदी रोहित शर्मा कायम आहे. रोहित शर्माला त्याच्या वाढदिवशी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मिळाली आहे. आज रोहित शर्माने वयाच्या ३७व्या वर्षात पदार्पण केले. याच निमित्ताने रोहित शर्माची आई पुर्णिमा शर्मा यांनी त्याचा एक जुना फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
पुर्णिमा शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. रोहित शर्मा अगदीच नवखा असताना त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली असतानाचा एक फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये रोहित शर्माने मुंबई क्रिकेट असोशिएशनची जर्सी घातलेली दिसते. अगदी तरूण असलेल्या रोहित शर्माचा त्याच्या आईबरोबरच्या फोटोला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली आहे. तसेच फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, सध्या रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या संघासोबत IPL 2024 मध्ये खेळत आहे. गेल्या हंगामापर्यंत रोहित या संघाचा कर्णधार होता. पण या वर्षीपासून तो संघात केवळ सलामीवीर फलंदाजाची भुमिका पार पाडताना दिसत आहे. यंदाच्या हंगामात रोहित शर्माने ९ सामन्यांमध्ये १६०च्या स्ट्राइक रेटने ३११ धावा केल्या आहेत. आज लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये लखनौ सुपरजायंट्स संघाविरूद्ध तो खेळताना दिसणार आहे.
तसेच, १ जूनपासून अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर सुरु होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधारच्या भूमिकेत दिसणार आहे.
- टी२० विश्वचषक स्पर्धा २०२४साठी भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
- राखीव खेळाडू- शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद