Rohit Sharma Controversy: टीम इंडियाने २९ जूनला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला. त्या दिवशी संपूर्ण भारत देशाने हा क्षण एखाद्या उत्सवासारखा भारताचा तिरंगा ( Indian Flag ) हाती घेऊन साजरा केला. तब्बल १७ वर्षांनी भारताला टी20 विश्वचषक ( T20 World Cup 2024 ) जिंकता आला. त्यामुळेच रोहित शर्मा, विराट कोहली आणि संपूर्ण टीमचे ( Team India ) भरपूर कौतुक झाले. कपिल देव, महेंद्र सिंह धोनी यांच्यानंतर वर्ल्ड कप जिंकवून देणारा रोहित शर्मा हा केवळ तिसरा भारतीय कर्णधार ठरला. त्याच्या नेतृत्वशैलीचेही भरपूर कौतुक झाले. पण सध्या रोहित शर्मा एक वेगळ्या कारणाने चर्चेत आला असून, त्याच्या चाहते नाराज असल्याची चर्चा आहे.
नक्की काय घडला प्रकार?
रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाच्या प्रतिभेने आणि संघाप्रती असलेल्या समर्पणाने साऱ्यांचे मन जिंकले. पण अचानक रोहित शर्माने बदललेल्या प्रोफाईल फोटोमुळे सध्या त्याच्यावर टीका केली जात आहे. रोहित शर्माने सोमवारी सोशल मीडियावर त्याचा प्रोफाइल फोटो बदलला.
फोटोमध्ये रोहित शर्मा बार्बाडोसच्या मैदानावर तिरंगा फडकवत होता. रोहितचा हा प्रोफाईल फोटो अनेक चाहत्यांना आवडला नाही. रोहितकडून या फोटोत तिरंग्याचा अपमान केला जात असल्याचे काहींचे म्हणणे आहे. कारण तिरंगा ध्वजाने जमिनीला स्पर्श केलेला आहे.
----
----
अशा प्रकारे फोटो ठेवणे हा तिरंग्याचा अपमान असल्याचे चाहत्यांनी ट्विट करून रोहित शर्माला सांगितले आहे. एका चाहत्याने लिहिले की, ध्वज संहितेच्या नियमांनुसार तिरंगा ध्वज जमिनीवर स्पर्श करू नये. त्यामुळे तिरंग्याचा अपमान करू नका, असे आवाहन त्या चाहत्याने रोहित शर्माला केले आहे. रोहितने असा प्रकार जर भारतात केला असता तर मोठा गोंधळ होऊ शकला असता, असेही अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. तर रोहित शर्माला ध्वजाबद्दलचा हा नियम माहीत आहे का? असाही सवाल काहींनी विचारला आहे.