Rohit Sharma On India's ICC T20 World Cup 2024 - रोहित शर्माचे वादळ काल बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर घोंगावले. ६९ चेंडूंतील १२१ धावांच्या नाबाद खेळीत त्याने ११ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी केली. १४ महिन्यानंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघात परतलेल्या रोहितला पहिल्या दोन सामन्यांत भोपळाही फोडता आला नाही, परंतु तिसऱ्या सामन्यात त्याने सर्व उणीव भरून काढली. भारताचे ४ फलंदाज २२ धावांवर माघारी परतले असताना रोहित खंबीर उभा राहिला आणि रिंकू सिंगसह १९० धावांची भागीदारी करून संघाला २१२ धावांपर्यंत पोहोचवले.
अफगाणिस्ताननेही टफ फाईट दिली. दोन सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रोहितच्या चतूर निर्णयाने कमाल केली. रवी बिश्नोईला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये षटक देण्याचा रोहितचा निर्णय सर्वांना अचंबित करणारा होता, परंतु त्याने भारताचा विजय पक्का झाला. २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर रोहित व विराट कोहली या फॉरमॅटपासून लांब होते. या कालावधीत बीसीसीआयने हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवले. सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल यांनीही कर्णधारपद सांभाळले. पण, वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील रोहितचे नेतृत्व व कामगिरी पाहून पुन्हा एकदा त्याला ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सांभाळण्याची जबाबदारी दिली गेली.
भारतीय संघ आता थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उतरणार आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानविरुद्धची मालिका ही महत्त्वाची होती. जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत कोणते खेळाडू खेळतील, हे या मालिकेतून सर्वांना कळणार होते. त्याचवेळी रोहितनेही आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून चाहत्यांना खूश केले. रोहितच्या या विधानाने तोच वर्ल्ड कप मध्ये संघाचा कर्णधार असेल, हे स्पष्ट होत आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या संघ निवडीबाबत जिओ सिनेमाशी बोलताना रोहित म्हणाला, "आम्ही अद्याप १५ खेळाडूंचा संघ निश्चित केलेला नाही, परंतु आमच्या मनात ८ ते १० खेळाडूंची नावे आहेत. आम्ही परिस्थितीनुसार संघाची जुळवाजुळव करू. वेस्ट इंडिजमध्ये खेळपट्टी संथ आहे, त्यामुळे आम्हाला त्यानुसार संघ निवडावा लागेल."
तो म्हणाला, " तुम्ही १५ खेळाडूंना आनंदी ठेवू शकत नाही. बेंचवर बसलेले चार खेळाडूंना आपण का खेळत नाही, असा प्रश्न विचारतात? मी शिकलो आहे की तुम्ही सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही आणि तुमचे लक्ष संघाच्या ध्येयावर असले पाहिजे.” टीम इंडियाला ५ जूनला वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडचा सामना करायचा आहे, यानंतर ९ जूनला त्यांची टक्कर पाकिस्तानशी होणार आहे. १२ व १५ जूनला भारतीय संघ अनुक्रमे अमेरिका व कॅनडा यांचा सामना करेल.