Rohit Sharma on Shikhar Dhawan, IND vs WI 2nd ODI: भारताने नवा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली वन डे मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजयासाठी भारताला थोडंसं झुंजावं लागलं. पण अखेर भारतीय गोलंदाजांनी संघाला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला २३७ धावाच करता आल्या. पण त्यानंतर प्रसिध कृष्णाच्या १२ धावांत ४ बळींच्या कामगिरीमुळे भारताने वेस्ट इंडिजला ४४ धावांनी पराभूत करत संघाला विजयश्री मिळवून दिली. पहिल्या दोन सामन्यात शिखर धवन कोरोनामुळे खेळू शकला नाही. पण तिसऱ्या सामन्यात तो खेळणार आहे की नाही, याबद्दल रोहित शर्माने उत्तर दिलं.
'गब्बर'चं स्था धोक्यात?
दुसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्मासोबत लोकेश राहुल ओपनिंग करेल अशी साऱ्यांना अपेक्षा होती. पण तो चौथ्या क्रमांकावर आला. आश्चर्य म्हणजे ऋषभ पंतला ओपनिंगला खेळवण्यात आले. त्यामुळे शिखर धवनचे संघातील स्थान धोक्यात आहे का? अशा आशयाचा सवाल रोहितला करण्यात आला. त्यावर रोहित म्हणाला, "ऋषभ पंतला सलामीला उतरवणं हा एक प्रयोग होता. शिखर धवन पुढच्या सामन्यात संघात नक्कीच परतेल. पण सध्या आमचा असा विचार आहे की आम्ही काही सामने हरलो तरी चालेल पण आम्ही नवनवे प्रयोग करतच राहू. आमचे आताचे प्रयोग हे दीर्घकाळाच्या भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. आतासुद्धा शेवटच्या वन डे सामन्यासाठी नक्की कोणतं कॉम्बिनेशन चांगलं ठरेल यावर चर्चा करूनच आम्ही निर्णय घेऊ", असं रोहितने स्पष्ट केलं.
ऋषभ पंतच्या सलामीला येण्यावर रोहित म्हणाला...
"काहीतरी वेगळा प्रयोग करण्याबाबत आमची संघ व्यवस्थापनासोबत चर्चा झाली होती. त्याचाच भाग म्हणून आज ऋषभ पंतला सलामीला फलंदाजी करण्यास पाठवण्यात आले. हा प्रयोग कायमस्वरूपी नाही. आज आम्हाला काहीतरी वेगळं करून पाहायचं होतं म्हणून तो प्रयोग करण्यात आला. आम्हाला सातत्याने काहीतरी नवे प्रयोग करायचे आहेत," असं रोहितने सामन्यानंतर बोलताना स्पष्टीकरण दिलं.
मालिका विजयावर काय म्हणाला नवा कर्णधार रोहित शर्मा...
"मालिका जिंकणं ही नक्कीच आनंदाची बाब आहे. आम्ही जेव्हा फलंदाजीस उतरलो तेव्हा सामन्यात आव्हानात्मक परिस्थिती होती. सूर्यकुमार आणि लोकेश राहुल यांच्यातील भागीदारी आमच्यासाठी महत्त्वाची ठरली. जेव्हा तुमचे अनुभवी फलंदाजी चांगली कामगिरी करतात तेव्हा तुम्हाला त्याचा निकाल योग्यच मिळतो. त्यामुळे विजयाचा आनंद द्विगुणित झाला", अशा भावना रोहितने व्यक्त केल्या.