मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. अपेक्षितपणे कामगिरीत सातत्य न राखणाऱ्या लोकेश राहुलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्याजागी युवा फलंदाज शुबमन गिलला संधी मिळाली आहे. राहुलच्या अनुपस्थितीत हिटमॅन रोहित शर्मा कसोटीत सलामीली खेळणार हे निश्चित झाले आहे. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी रोहितला कसोटीत सलामीला संधी देण्यात येईल असे सूचक विधानही केले. पण, सलामीची ही जबाबदारी म्हणजे रोहितवर अधिकचे दडपण, असे मत व्यक्त केले जात आहे. पण, पाच दिवसांच्या सामन्यात ओपनिंग करण्याची ही रोहितची पहिलीच वेळ नक्की नसेल. यापूर्वीही तो पाच दिवसांच्या सामन्यात सलामीला आला होता.
रोहितनं नोव्हेंबर 2013मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. त्यानंतर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो शेवटचा कसोटी सामना खेळला. या पाच वर्षांत रोहितनं 27 कसोटींत 39.62 च्या सरासरीनं 1585 धावा केल्या. त्यात 3 शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात 3 ते 6 क्रमांकावर फलंदाजी केली आहे. सहाव्या क्रमांकावर त्यानं सर्वाधिक 16 सामन्यांत 1037 धावा केल्या आहेत. पण, सध्या भारतीय संघाची गरज पाहता आफ्रिकेविरुद्ध तो सलामीला खेळू शकतो.
भारतीय संघात मधल्या फळीत विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी हे सक्षम पर्याय आहेत. सहाव्या - सातव्या क्रमांकावर रिषभ पंत व रवींद्र जडेजा हे फलंदाजी करतील. त्यामुळे सलामीसाठी रोहितचे पारडे जड मानले जात आहे. या जबाबदारीमुळे रोहितवरील दडपण नक्की वाढले असेल, त्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सलामीची त्याची कामगिरी तितकीशी बोलकी नाही. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध रोहितच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहितनं आतापर्यंत तीन प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. 2008-09 च्या
रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सौराष्ट्रविरुद्ध रोहितनं 40 चेंडूंत नाबाद 30 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2010-11च्या रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्यानं 73 चेंडूंत 68 धावा केल्या होत्या. 2012-13च्या रणजी स्पर्धेतही पंजाबविरुद्ध त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती आणि त्यात त्यानं 11 चेंडूंत 28 धावा केल्या होत्या. पण, या तीनही सामन्यांत अखेरच्या दिवशी रोहितला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती.
भारताचा कसोटी संघ : विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शुबमन गिल.
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
दुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
तिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
Web Title: Rohit Sharma as an opener in FC cricket; He is likely to open against South Africa
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.